रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत झाली “महा बीघाडी” : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जुंपली
सिटी बेल | विषेश प्रतिनिधी |
राज्याच्या सत्ताकारणात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र बसली असली तरी रायगड जिल्ह्यात मात्र हे तीनही पक्ष एकमेकांच्या उरावर बसण्यास उत्सुक असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या परिवारा विरुद्ध महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी आघाडी उघडल्याचे दिसत आहे.
खासदार सुनील तटकरे आणि शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांचे वैर तर सर्वश्रुत आहेच. यांच्यात अधून-मधून खटके उडत असतात. परंतु सध्या चर्चेत आहे तो शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाद. यातच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी देखील आम्हाला गृहीत धरू नये असा इशारा तटकरेंना दिला आहे.
कर्जत चे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी काही महिन्यांपूर्वी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केले होते. त्यातच कर्जतचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांचे आणि थोरवे यांचे अधून-मधून खटके उडत असतातचं. नुकतेच अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी देखील तटकरेंवर तोंडसुख घेतले होते. यात कमी की काय ? तर काल-परवा माजी केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अनंत गिते यांनी शरद पवार यांना पाठीत खंजीर खुपसणारे असे म्हणून राष्ट्रवादीच्या स्वाभिमानावर घाव केला आहे.
रायगड जिल्ह्यातील तटकरे परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावर होणाऱ्या चौफेर हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उभे ठाकले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून काल पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे महानगरपालिका जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना व काँग्रेसच्या नेत्यांचा निषेध केला.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे नवी मुंबई प्रभारी प्रशांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर सडकून टीका केली. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या इतर नेत्यांवर देखील तोंडसुख घेतले. यावेळी प्रशांत पाटील यांनी शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील हे सुनील तटकरे यांच्याकडे जाऊन वारंवार लोटांगण घालत होते आणि आपली कामे करून घेत होते असे विधान देखील केले. त्यामुळे आता येथील स्थानिक राजकारण देखील तापण्याची चिन्हे आहेत. पाहुया शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा हा वाद आगामी काळात कोणत्या थराला जाणार आहे.










Be First to Comment