
शेकापचे रमाकांत म्हात्रे यांच्या प्रयत्नाला यश
सिटी बेल लाइव्ह मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच झोपी गेलेले अधिकारी जागे झाले
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) :
जासई कडून गव्हाणकडे जाणार्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्तावर जागोजागी खड्डेरूपी तळे साचल्याने प्रवास करताना नागरिकांना हालअपेष्टा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच समजत नाही. हा रस्ता वेळीच दुरुस्त झाला नाही तर याच खड्डयात बसून आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी दिला होता. याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत आज दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
जासई-गव्हाण रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य पसरले होते. याची दखल शेकापचे रमाकांत म्हात्रे यांनी घेत त्या विरोधात आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिला होता. याचे वृत्त सिटी बेल लाइव्ह मध्ये प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे झोपी गेलेले अधिकारी खडबडून जागे होत त्यांनी आज सकाळपासून रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत. मात्र सतत पडणाऱ्या पावसात वाहून गेल्यानंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होणार आहे. तरी यावर कायम स्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. सदरचा रस्ता काँक्रीटीकरण करणे आवश्यक आहे. याबाबतचा प्रस्ताव पडून असल्याचे अधिकारी वर्ग सांगतात.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या वृत्ताची दखल घेऊन उपाययोजना केली तशीच त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांचे वृत्त प्रसिद्ध होण्याआधी ते ही दुरुस्त करण्यात यावेत.
शेकापचे रमाकांत म्हात्रे यांच्या मागणीची दखल घेऊन त्वरित रस्ता दुरुस्त केल्याबद्दल त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता भोये व बांगर यांचे आभार मानले आहे.






Be First to Comment