कुणबी समाजोन्नती संघाच्या मुलूंड येथील विद्यार्थी वस्तीगृहासाठी ५ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सुपूर्द
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
शंभर वर्षे पूर्ण होत असलेल्या कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या संस्थेच्या मुलुंड येथील विद्यार्थी वसतिगृहासाठी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कडून मंजूर करण्यात आलेला ५ कोटी रुपयांचा धनादेश मुंबई येथील सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते समाजोन्नती संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
त्यामुळे रोहा तालुक्यासह कोकणातील कुणबी समाज बांधवांतून समाधान व्यक्त करण्यात येत असून समाज बांधवांकडून महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त करण्यात येत असल्याचे कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईच्या रोहा शाखेचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथी गृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबईचे अध्यक्ष भुषण बरे, पदाधिकारी संदीप राजपुरे, शंकरराव कांगणे, रोहा शाखा अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, रोहा शाखेतील पदाधिकारी सुरेश मगर, रामभाऊ सकपाळ, अनंत थिटे, गुणाजी पोटपोढे, सतीश भगत, महेश बामुगडे आदींसह कोकणातील सर्व जिल्ह्यांतील ग्रामीण आणि मुंबई मधील संघटनेचे पदाधिकारी, समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या संस्थेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याने संस्थेसाठी काहीतरी भरीव मदत राज्य सरकार कडून मिळावी यासाठी कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भुषण बरे, पदाधिकारी संदीप राजपुरे, शंकर कांगणे यांनी खा. सुनील तटकरे यांची भेट घेतली होती. त्यानुसार कुणबी समाजोन्नती संघाचे पदाधिका-यांसह प्रमुख २५ जणांनी खा. सुनील तटकरे यांच्या समवेत देशाचे नेते व राष्ट्वादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची कुणबी समाजोन्नती संघाला निधी मिळण्यासाठी भेट घेतली होती.
त्यानंतर खा. शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना केलेल्या सूचनेनुसार अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यानुसारच हा धनादेश देण्यात आला. यासाठी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केलेले प्रयत्न मोलाचे ठरले आहेत.
कुणबी समाजोन्नती संघाला १०० वर्षे पूर्ण होत असतांनाच संघाच्या मुलूंड येथील विद्यार्थी वस्तीगृहासाठी ५ कोटींचा निधी मिळाला असल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या कुणबी समाजातील विद्यार्थ्यांची येथे राहण्याची चांगली व्यवस्था होणार आहे. देशाचे नेते शरद पवार साहेबांमुळेच राज्यात प्रथमच एका समाज संस्थेला मोठा निधी मिळत आहे. त्यामुळेच कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई या संस्थेला ५ कोटी रूपयांचा धनादेश देत असतांना मला आनंद होत असल्याची भावना खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.










Be First to Comment