जिंदाल रूग्णालयातील कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
कोरोना विषाणूचा रोहा तालुक्यात मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यानंतर आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यातच नागोठणे विभागातील सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या निवासी वासाहती मध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या हे रुग्ण कोरोंटाईन असतांनाही रूग्णालयात तपासणी करण्यासाठी येत असल्याने त्याचा त्रास आम्हाला होऊ शकतो या सबबीखाली जोपर्यंत आमच्या सुरक्षेची हमी दिली जात नाही तोपर्यंत काम सुरु करण्यात येणार नाही असे सांगून जिंदाल रुग्णालयातील डाॅक्टर व इतर मिळून सुमारे २१ जणांनी आज दुपार पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
सुकेळी येथील जिंदाल कंपनीच्या अंतर्गत असलेले हे रुग्णालय बी.सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत चालविले जात आहे. या रूग्णालयात कंपनीतील कामगार व आजूबाजूच्या गावांतील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. मात्र सध्या दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण जिंदाल कंपनीच्या परिसरात वाढत असल्याने व पाॅझिटिव्ह होऊन नंतर उपचार करुन आलेले रुग्ण घरात कोरोंटाईन असतांनाही बाहेर फिरतांना दिसत असल्याचे बोलले जात आहे. विशेष करुन जिंदाल रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या जिंदाल कंपनीच्या निवासी इमारती मधील कोरोंटाईन रुग्ण रुग्णालय परिसरात फिरत असल्याचा आरोप रूग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे मुंबईतील एका खासगी रूग्णालयात कोरोनाची तपासणी करुन आलेला कंपनीचा एक कर्मचारी, त्याची पत्नी व मुलगी हे तिघेजण कोरोंटाईन असतांनाही आज सकाळी रूग्णालयातील डाॅक्टरकडे तपासणीसाठी आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज दुपारी एक वाजता येथील मुख्य वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्राताप राठोड यांच्या सोबत एक बैठक घेतली व जोपर्यंत आमच्या सुरक्षेच्या बाबतीत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्यात येईल असे सांगितले आहे.
दरम्यान यासंदर्भात जिंदालचे जनसंपर्क अधिकारी के.के. पांडे यांनी सांगितले की, जे तिघेजण आज रूग्णालयात तपासणी करण्यासाठी गेले होते त्यांच्यातील कंपनीचा कर्मचारी असलेल्या त्या व्यक्तीने मुंबई येथील एका खासगी रूग्णालयात कोरोना तपासणी केलेली असुन आपण पाॅझिटिव्ह असल्याचे त्यांनी व्यवस्थापनास कळविले होते. मात्र त्यामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे त्याला रोहा येथे तपासणीसाठी जाण्याचा सल्ला कंपनी व्यवस्थापनाकडून देण्यात आला होता. त्यासाठी त्यांना व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना रोहा येथे घेऊन जाण्यासाठी बोलविलेली रुग्णवाहिका त्यांना घेण्यासाठी येण्यास उशिर झाल्याने ते रूग्णालयात डाॅ. प्रताप राठोड यांच्याकडे चौकशीसाठी गेल्याचे के.के.पांडे यांनी सांगितले. नंतर त्यांना रोहा येथे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आमची बैठक सुरु असुन त्यावर मार्ग काढण्यात येईल असेही पांडे यांनी सांगितले. तसेच आमच्या निवासी वसाहती मधील कोरोना रुग्णांचा सर्व अहवाल रोहा तहसीलदार यांना पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






Be First to Comment