सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी परिसरातील जवळपास 753 गणपती आणि 197 गौराईंना भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.पाच दिवसाच्या आनंदीत वास्तव्य,पाहुणचार घेऊन गौरी गणपती पुन्हा आपल्या गावी गेल्याने अनेक भक्तगण विशेषतः लहान मुले व महिलांच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसून आले.
आतुरतेने वर्षभर गौरी व गणरायाची वाट पाहात असताना शुभ आगमन झाले.पाच दिवस गणेश भक्तांनी मंगलमय वातावरणात व शासकीय नियमांचे पालन करून गोरी गणपती बाप्पाची सेवा केली.कोरोनामुळे व अन्य कारणांनी अनेकजण दगावले आहेत,त्यामुळे काही ठिकाणी वातावरण शांत होते.पण बाप्पाच्या सेवेत खंड पडू दिला नाही.
गणेशभक्तांनी शासन सुचनांचे पालन करीत आपल्यातील उत्साह मात्र कायम ठेवला असल्याचे दिसून आले.रसायनी परिसरातील रिस पुल,कांबे नदी,मोहोपाडा तलाव, तळेगाव वाडी घाट, पाताळगंगा नदी,रसेश्वर मंदिर घाट,वावेघर,गुळसुंदे घाट,कासप आदी ठिकाणी गौरी गणपतींना जड अंतःकरणाने भावपूर्ण निरोप देण्यात आला.
मोहोपाडा येथे तलावावर गणपती विसर्जन झाल्यानंतर गौराईंची महिलांनी पुजा करुन आशिर्वाद घेतले.यानंतर विसर्जन स्थळी जाताना मोहोपाडा गावातून बाजारपेठेतील श्री दत्त मंदिराच्या सभामंडपात नागरिकांनी ढोलाच्या तालावर गौराई गीतांवर पारंपरिक नाच केला.यावेळी गोराई गीतांनी परिसर दुमदुमला.यानंतर मोहोपाडा तलावावर गौराईचे विसर्जन केले.यावेळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विसर्जन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Be First to Comment