350 जणांचा कोरोनाने घेतला बळी : रुग्णसंख्येत राज्यात चवथ्या स्थानी
पालघरला टाकले मागे, लस सापडेना, कोरोना आटपेना : चिंतेत भर
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून शहरी व ग्रामीण भागाला कोरोनाने घट्ट विळखा घालण्यास सुरवात केली आहे. आजघडीला जिल्ह्यात 14 हजार रुग्णसंख्या पार केल्याची माहिती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या https://www.covid19india.org/ या वेबसाइटवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर तर पालघर जिल्ह्याला मागे टाकत रायगड जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आला आहे. कोरोना रुग्णसंख्येत मुंबई,ठाणे, पुणे नंतर रायगड जिल्ह्याचा क्रमांक लागतो आहे. याबरोबरच जिल्ह्यात आजवर साडेतीनशे हुन अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याने जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली आहे. रायगड जिल्ह्यातील दहा दिवसांच्या लॉक डाऊनमध्ये 4 हजार 747 रुग्णांची भर पडली असल्याची आकडेवारी समोर आली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वेग वाढत असून एका दिवसात 452 नव्या करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. अशातच दिलासादायक बाब म्हणजे आजवर जिल्ह्यातील विविध वयोगटातील 9 हजार रुग्णांनी कोरोनाला हरविले आहे.
एका दिवसात 16 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
दिवसभरात 16 व्यक्तींची मृत म्हणून नोंद झाली असून यामध्ये (पनवेल (मनपा)-9, पनवेल (ग्रामीण)-2, खालापूर-1, अलिबाग-1, रोहा-2, महाड-1) असा समावेश आहे.
9 हजार रुग्णांनी जिंकले कोरोना युद्ध
आजमितीस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्या एकूण 3 हजार 697 झाली आहे. यामध्ये पनवेल मनपा-1411, पनवेल ग्रामीण-397, उरण-173, खालापूर-393, कर्जत-105, पेण-355, अलिबाग-340, मुरुड-42, माणगाव-73, तळा-1, रोहा-126, सुधागड-9, श्रीवर्धन-28, म्हसळा-66, महाड-161, पोलादपूर-17 रुग्ण असा समावेश आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-4 हजार 175, पनवेल ग्रामीण-1 हजार 390, उरण-562, खालापूर-369, कर्जत-297, पेण-595, अलिबाग-508, मुरुड-71, माणगाव-177, तळा-20, रोहा-314, सुधागड-10, श्रीवर्धन-92, म्हसळा-100, महाड-150, पोलादपूर-44 अशी एकूण 8 हजार 874 आहे.
402 रुग्णांनी कोरोनाला हरविले
कोरोनाने संपूर्ण जगाला हादरविले असले तरी कोरोनाला हरविणारे देखील कमी नाहीत. जिल्ह्यात एका दिवसात 402 रुग्ण कोरोनाचे युद्ध जिंकून सुखरूप घरी परतले आहेत. यामध्ये पनवेल मनपा-119, पनवेल ग्रामीण-106, उरण-15, खालापूर-7, कर्जत-5, पेण-32, अलिबाग-57, मुरुड-1, रोहा-10, सुधागड-1, श्रीवर्धन-4, महाड-11 असा समावेश आहे.
350 रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी
रायगड जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यदर देखील वाढत असून आतापर्यंत कोरोनाने 350 हुन अधिक रुग्णांचा बळी घेतला आहे. यामध्ये पनवेल मनपा-150, पनवेल ग्रामीण-41, उरण-22, खालापूर-23, कर्जत-12, पेण-19, अलिबाग-23, मुरुड-9, माणगाव-3, तळा-2, रोहा-11, सुधागड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-7, महाड-18, पोलादपूर-5 असे एकूण 350 नागरिक मृत पावले असल्याची नोंद आहे.
एका दिवसात 452 रुग्णांची वाढ
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे आकडे दिवसेंदिवस धक्कादायकरित्या वाढत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी दिवसभरात 20-25 असे अत्यल्प संख्येत आढळणारे रुग्ण आता 400 -500 च्या पटीत आढळत आहेत. जिल्ह्यात दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत 452 ने भर पडली आहे. तपशीलनुसार पनवेल मनपा-157, पनवेल (ग्रा)-39, उरण-26, खालापूर-16, कर्जत-18, पेण-46, अलिबाग-24, मुरुड-1, माणगाव-3, रोहा-29, श्रीवर्धन-1, म्हसळा-44, महाड-42, पोलादपूर-3 अशा प्रकारे समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून 42 हजार 295 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 387 आहे.
लस सापडेना, कोरोना आटपेना
संपूर्ण जगाची झोप उडविणाऱ्या महाभयंकर कोरोनावर लस कधी येणार याची सर्वानाच प्रतीक्षा लागली आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 14 लाखाच्या घरात असून आजवर 32 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. राज्यात पावणे चार लाखाच्या घरात रुग्णसंख्या पोहचली असून 13 हजारहून अधिक रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रोग प्रतिकारक शक्ती च्या गोळ्या देऊन रुग्णांवर उपचार केले जात आहेत.मात्र कोरोनाला मुळासकट उघडून फेकायचे असेल तर इतर साथीच्या रोगप्रमाणे प्रभावी लस चा शोध लागणे गरजेचे आहे. मात्र
लस सापडेना आणि कोरोना आटपेना अशी परिस्तिती संपूर्ण राज्य व देशभरात झाली आहे. त्यामुळे कोरोनाचा अंत कधी होईल हीच प्रतीक्षा आज प्रत्येक नागरिकाला आहे.
अर्थचक्र कोलमडले, सर्वसामान्य संकटात
कोरोनाच्या जैविक महामारीने व सततच्या लॉकडाऊन मुळे झोपडीत राहणाऱ्या गोरगरीब घटकांपासून महाल व ऐशोरामात राहणाऱ्या गर्भ श्रीमंतांची आर्थिक गणित विस्कटली आहेत. मध्यमवर्गीय व गर्भ श्रीमंतांची परिस्तिती काहीशी बेताची आहे. मात्र हातावर पोट असलेल्या कष्टकरी, श्रमजीवी, मजूर, आदिवासी बांधव यांची परिस्तिती अत्यंत हलाखीची आहे. हाती रोजगार नसल्याने घरात मीठ आहे तर डाळ नाही, मसाला आहे तर तेल नाही अशा दारिद्र्य अवस्थेत गोरगरीब लोक जगत आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत मात्र कोव्हिडं सारख्या राष्ट्रीय आपत्तीत शासन तरी कुणाकुणाचे अश्रू पुसणार अशी अवस्था झाली आहे.
ग्रामीण भाग कोरोनाच्या विळख्यात
लाख प्रयत्न केले तरी कोरोनाचा संसर्ग थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाने प्रारंभी पनवेल, उरण आदी तालुक्यात धीम्या गतीने प्रवेश केला, नंतर कोरोनाने वेग घेत शहरी भागाला घट्ट विळखा घातला. उत्तर रायगडातून कोरोनाने दक्षिण रायगडात पाय पसरले.आजघडीला ग्रामीण रायगड कोरोनाच्या विळख्यात सापडला असून नागरिकांमध्ये अधिक भीतीचे वातावरण पसरले आहे.
ओद्योगिक कारखान्यात कोरोना
रायगड जिल्ह्यातील अनेक बडे उद्योगधंदे, कारखाने यामध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे. रोहा, पेण, खालापूर , महाड, उरण, पनवेल, अलिबाग सह अनेक तालुक्यातील कंपन्यांतील कायमस्वरूपी व कंत्राटी कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याने चिंता वाढली आहे.
म्हसळा तालुक्यातील तुरुंबाडी, रोहिणी या गावांना लागून असलेल्या दास ऑफशोर इंजिनिअरिंग प्रा. लि. कंपनीतील तब्बल 37 कामगारांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे कंपनीसह परिसरातील गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
लॉकडाऊन संपला, जनजीवन पूर्वपदावर

रायगड जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखणे व रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉक डाऊन घोषित करण्यात आला होता. हा लॉक डाऊन 26 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार होता. मात्र लॉक डाऊन काळात ही रुग्णसंख्येत घट न झाल्याने पुन्हा 24 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉक डाऊन हटविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला. यामुळे रायगड जिल्ह्यातील जनजीवन पूर्ववत झाले, विशेषतः व्यापारी, दुकानदार यांना या निर्णयाने दिलासा मिळाला.
जिल्हाधिकारी यांचे आवाहन

कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी मागील दोन महिन्याहुन अधिक काळ जिल्हाधिकारी निधी चौधरी अत्यंत कर्तव्येदक्ष पणे प्रभावीरित्या कामकाज पहात असून प्रशासनाला जिल्ह्यातील जनतेने सर्वोतोपरी व सातत्याने सहकार्य करण्याचे आवाहन करीत आहेत. शासनाचे नियम व अटी शर्थीचे पालन करा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, घरातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांची अधिक काळजी घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले.






Be First to Comment