Press "Enter" to skip to content

पत्रकारांच्या सहकार्याची समाजाला गरज आहे – खासदार श्रीरंग बारणे

कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लबच्या वतीने ‘संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

‘आता सारे झपाट्याने बदलत आहे. त्यातच कोविड महामारीचे संकट आपल्यावर आले आहे. यामध्ये कितीतरी आपले नातेवाईक, जवळची माणस आपल्याला सोडून गेली आहेत. संतोष पवारांसारखा एक गुणी पत्रकार आपल्यातून जाणे हे माथेरांचेच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये समाजाला पत्रकारांच्या सहकार्याची गरज आहे.’ असे प्रतिपादन मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी येथे केले.

माथेरान मधील पत्रकार संतोष पवार यांना कोरोना झाल्यानंतर वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे कायम स्मरण राहावे म्हणून कर्जत प्रेस क्लब आणि माथेरान प्रेस क्लबच्या वतीने ‘संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन माथेरान मधील कम्युनिटी हॉल मध्ये करण्यात आले होते. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून समारंभाचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, माथेरान नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, कर्जत नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, जेष्ठ कवी अरुण म्हात्रे, शाहीर संभाजी भगत, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय चे उपसंचालक डॉ गणेश मुळ्ये, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, मनोज खेडकर, विवेक चौधरी, प्रसाद सावंत, पवार यांच्या मातोश्री सुशीला पवार,पत्नी मनीषा पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष ऍड राहुल देशमुख, माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष दिनेश सुतार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. रायगड प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष संतोष पेरणे यांनी प्रास्ताविक केले. पवार यांच्या भगिनी उज्वला यांचा कंठ मनोगत व्यक्त करताना दाटून आला. यावेळी सभागृहातील उपस्थितांचे डोळे पाणावले. त्यानंतर संतोष पवार स्मृती राज्य संपादक पत्रकारिता पुरस्कार दिव्या मराठीचे संपादक संजय आवटे यांना प्रदान करण्यात आला.

सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि अकरा हजार एकशे अकरा रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. तर जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार विजय मांडे यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी या दोन्ही सत्कार मूर्तींनी संतोष पवार आणि त्यांच्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला. संतोष पवार यांचे सुपुत्र मल्हार पवार यांनी बाबांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, गणेश मुळ्ये यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

संतोष पेरणे संपादित व विजय मांडे अतिथी संपादक असलेले कर्जत तालुक्यातील पर्यटनाचा मागोवा घेणाऱ्या ‘डेस्टिनेशन कर्जत – नेरळ – माथेरान’ आणि संतोष पवार यांच्या जीवनावर आधारित ‘दिलखुलास’ या पुस्तिकेचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अरुण म्हात्रे यांनी कविता सादर करून पवार यांच्या आठवणी सादर केल्या. संभाजी भगत यांनीही मनोगत व्यक्त केले.

आमदार महेंद्र थोरवे यांनी आपल्या मनोगतात, ‘पवार यांच्या आकस्मित जाण्याने माथेरान नव्हे तर कर्जत मतदार संघाचे अपरिमित नुकसान झाले आहे. लोकशाहीच्या तीन स्तंभा नंतर चौथा स्तंभ तुम्हा पत्रकारांच्या रूपाने ठामपणे उभा आहे म्हणूनच सारे काही सुरळीत चालले आहे. पवारांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर झालेला आघात सुद्धा भयंकर आहे.’ असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन डॉ. नितीन आरेकर तर आभार प्रदर्शन दिनेश सुतार यांनी केले.

याप्रसंगी माजी नगराध्यक्षा वंदना शिंदे, सुहासिनी शिंदे, आशा कदम, शिवाजी शिंदे, संतोष पाटील, दिलीप गडकरी, अशोक शिंदे, प्रसाद पाटील, दत्तात्रेय म्हसे, अरविंद शेलार, सुनील शिंदे, पंकज ओसवाल आदींसह माथेरानकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.