सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण येथील अंकुर हॉस्पिटलमधून डॉ. नेहा बोलते असे सांगून पेण मधीलच जलाराम मेडिकल चे मालक जवाहर माधवलाल शहा यांची १ लाख रुपयांची फसवणुक केल्याची घटना घडली. या प्रकरणी पेण पोलिसांत अज्ञात महिले विरोधात व तिच्या साथीदारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पेण पोलीस या बंटी-बबलीचा शोध घेत आहेत.
पेण शहरात मागील अनेक महिन्यांपासून गुन्हेगारी घटनांत वाढ झाली असतांना शनिवारी सायंकाळी पेण येथील जलाराम मेडीकल चे मालक जवाहर शहा यांना एका अज्ञात महिलेने मोबाईल वर फोन करुन आपण अंकुर हॉस्पिटल मधून डॉ.नेहा बोलते मला काही औषधे व एक लाख रुपये सुट्टे पाहिजेत असे सांगितले सदर महिलेने पुन्हा एकदा फोन करुन औषधांची व सुट्टे पैसे पेशन्ट ना द्यायचे आहेत अशी मागणी केल्यामुळे दुकानाचे मालक जवाहर शहा यांनी आपल्या दुकानातील कामगार अरुण पाटील याला औषधे व एक लाख रुपये घेऊन अंकुर हॉस्पिटलमधील डाॅ. नेहा म्हात्रे यांना देऊन ये असे सांगितले.
कामगार अरूण पाटील हा अंकुर हॉस्पिटलमध्ये जात असताना हॉस्पिटल च्या खाली एका अनोळखी इसमाने अरुण पाटील यांना त्यांच्या नावाने आवाज देऊन औषधे डॉ.नेहा यांच्या कडे द्या व रोख रक्कम माझ्या कडे द्या असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अरुण याने एक लाख रुपये त्या अनोळखी इसमाकडे दिले व औषधे देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये डॉ. नेहा म्हात्रे आहेत का या बद्दल चौकशी केली असता आमच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. नेहा म्हात्रे नावाच्या कोणीही डॉक्टर काम करत नसल्याचे डॉ. राहुल म्हात्रे यांनी सांगितले.
अरुण पाटील यांनी तात्काळ खाली येऊन त्या इसमाचा शोध घेतला असता तो इसम एक लाख रुपये घेऊन पसार झाला असल्याचे आढळून आले. मेडीकलचे मालक जवाहर शहा यांनी या प्रकरणी अज्ञात महिला व पुरुष यांच्या विरोधात पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पेण पोलीस या बंटी-बबली चा शोध घेत आहेेत.








Be First to Comment