Press "Enter" to skip to content

जेएनपीटी आणि केअर पॉईंट हॉस्पीटल डॉक्टरांच्या प्रतिक्षेत

सिटी बेल लाइव्ह / उरण(घनश्याम कडू)

उरण तालुका म्हणजे भारतातील सर्वात जास्त उद्योगधंदे असणारा आणि सरकारला सर्वात जास्त महसुल मिळवुन देणारा तालुका असला तरी ह्या तालुक्यातील रूग्णांना उपचारासाठी मात्र वणवण फिरावे लागते हे उरणकरांचे दुर्दैव म्हणावे लागेल. सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने उरण तालुक्यात केअर पॉईंट हॉस्पीटल सुरू झाले. त्यामध्ये Covid Care Centre म्हणजे प्राथमिक अवस्थेत असलेले रूग्णांची सोय झाली. आजपर्यंत ज्या रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता ते एमजीएम कामोठे आणि उपजिल्हा रूग्णालय पनवेल येथे पाठवण्यात येत होते. परंतु रायगड मधील इतर तालुक्यातील रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने तेथे देखील रूग्णांना बेड मिळत नाही. हे लक्षात आल्यावर सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी जिल्हाधिका-यांपासुन ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांना फोन करून वास्तविकता लक्षात आणुन दिली. हे आणुन दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी जेएनपीटी हॉस्पीटल आणि केअर पॉईंट हॉस्पीटल येथे प्रत्येकी ५० ऑक्सीजन बेडची व्यवस्था करण्याचे आदेश तातडीने दिले.परंतु डॉक्टर अभावी यंत्रणा सुरू झालेली नाही तरी याकामी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वेळीच उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या केअर पॉईंट हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन बेडसाठी आवश्यक डागडूजी करून आवश्यक साहित्य स्वत: तहसिलदार उरण यांनी लक्ष घालुन त्याची पुर्तता केली आणि म्हणुन आज तीस ऑक्सीजन बेड तयार आहेत. पंरतु ती ऑक्सीजन व्यवस्थेचे निरीक्षण करण्यासाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरची गरज आहे. परंतु डाॅक्टर्स उपलब्ध नसल्याचे कारण देत आरोग्य विभाग हात झटकत आहे. तरी आरोग्य विभागाने ताबडतोब आदेश काढून त्या व्यवस्थेची जबाबदारी निश्चित करणे गरजेचे आहे, अन्यथा उरणकरांचे मरण अटळ आहे. तर दुसरीकडे जेएनपीटीने दोन आठवड्यात ४८ बेड्सची व्यवस्था करतो आणि दोन्ही हॉस्पीटलसाठी आवश्यक डॉक्टर्स आणि स्टाफची नेमणुक करतो असे सांगीतले होते. परंतु तसे काहीही होताना दिसत नाही. उलट जेएनपीटी हॉस्पीटल प्रशासन हे केअर पॉईंट हॉस्पीटलवर आपली जबाबदारी ढकलताना दिसत आहे. सध्या जेएनपीटी हॉस्पीटलमध्ये अनेक एम.बी.बी.एस. डॉक्टर्स असुन त्यापैकी काही डॉक्टर्स हे भुलतज्ञ, बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, सर्जन देखील आहेत. परंतु हे सर्व डॉक्टर्स आपली नैतीक जबाबदारी विसरून नको ती कारणे देवुन जबाबदारी पासुन दूर पळत आहेत. जेएनपीटीने जर ठरविले असते तर जेएनपीटी हॉस्पीटलमध्ये आत्ता २०० बेडचे सुसज्ज असे हॉस्पीटल तयार करू शकले असते. परंतु प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे व डॉक्टर्सच्या बेजबाबदारपणामुळे उरणकरांचे मरण अटळ आहे हे निश्चित चित्र स्पष्ट होत आहे. जर एखाद्या व्यक्तीला बेड मिळाला नाही आणि त्याचे काही बरे वाईट झाले तर त्याला सर्वस्वी जबाबदार जेएनपीटी प्रशासनाची राहील. तरी या सर्व प्रकरणात आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री आदिती तटकरे व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी जातीने लक्ष घालून ठोस उपाययोजना करून उरणकरांचे ऑक्सिजन अभावी जाणारे जीव वाचवावेत हीच उरणच्या जनतेची अपेक्षा आहे. अन्यथा जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.