कारवाईचा दिखावा करून आर्थिक सबंध तर जपले जात नाही ना ?
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू)
राज्यात मासेमारी बंदी असतानाही उरणमधील बोटी हे सर्व नियम झुगारून मासेमारी करण्यास जात आहेत. त्यामुळे ही मासेमारी बंदी उरणमध्ये कागदावरच आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. बंदीचा कालावधी १ जून ते ३१ जुलै असा ६१ दिवसांचा बंदीचा कालावधी घोषित असतो.
मासेमारी बंदीचा कालावधी सुरू झाला की कायदेशीर मासेमारी परवाने जमा करून आपल्या बोटी किनाऱ्यावर घेतात. ज्या मासेमारी संस्थेचा सभासद बंदी काळात मासेमारी करताना आढळला तर संबंधित संस्था व सभासदावर कारवाई करून त्यांचा डिझेल कोटा बंद करण्यात येईल असा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने आधीच मच्छीमारांना दिला आहे.
मत्स्यबीज व मासळीची पैदास चांगली व्हावी यासाठी बंदीचे काटेकोर पालन करणे मच्छीमारांच्या हिताचे असते. मच्छीमारांनी बोटी किनाऱ्यावर ओढल्या असल्यातरी उरणमधील मच्छीमारांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन करून मासेमारी सुरूच ठेवली होती. नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाई केली आहे. उरणमध्ये आजही अनेक बोटी मासेमारीसाठी गेल्याची माहिती नाखवा मंडळी देत आहेत. मग त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे. बोटी मासेमारी करून आल्यानंतर करंजा किनाऱ्यापासून काही अंतरावर उभ्या करून छोट्या बोटल्यानी मासळी किनाऱ्यावर आणून विक्री केली जात आहे. आजपर्यंत बोटींवर कारवाई केल्याचे समजते परंतु पुढे त्यांच्यावर काय कारवाई झाली हे गुलदस्त्यातच असते. कारवाईच्या नावाखाली आर्थिक सबंध तर जपले जात नाही ना? अशी चर्चा जनतेत सुरू आहे.






Be First to Comment