कर्जत तालुक्यातून पहिल्यांदाच महिला खेळाडूची निवड
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
रायगड जिल्ह्याच्या 19 वर्षांखालील महिला क्रिकेट संघात दहिवली येथील कु. साक्षी विलास लाड या महिला क्रिकेटपटूची निवड करण्यात आल्याने गावकी कडून तिचा सत्कार करण्यात आला. साक्षीच्या रूपाने कर्जत तालुक्यातून महिला क्रिकेटपटूची निवड होणे ही कर्जतच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे.
दहिवली मध्ये साक्षीच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माजी आमदार सुरेश लाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष शरद लाड, जेष्ठ नागरिक दत्तात्रेय लाड, शिरीष दिघे, माजी सरपंच संदेश गुरव, जेष्ठ नागरिक दत्तात्रय लाड, शिरीष दिघे, नंदू लाड, लक्ष्मीकांत लाड, ऋषिकेश दाभाड़े, तुषार देशमुख, जहीर खान आदी उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष राजेश लाड यांनी प्रास्ताविकात, ‘खरे तर क्रिकेट हा सर्वांचाच आवडीचा खेळ आहे. मात्र मुली त्यामध्ये करियर करतात हे चांगले आहे. दहिवली गावातून पहिल्यांदाच एक महिला क्रिकेटपटू उदयास येत आहे. त्या साक्षीला गावकीकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.’ असे स्पष्ट केले. याप्रसंगी साक्षीचा क्रिकेट किट, गणवेश, शाल व पुष्पगुच्छ देऊन माजी आमदार लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिरीष दिघे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार लाड यांनी, ‘हल्लीच्या मुलांना अन्न, वस्त्र निवाऱ्या बरोबरच क्रिकेटची सुद्धा आवश्यकता भासते. या खेळाकडे लक्ष केंद्रित करून आपल्या गावचे नाव उंचवावे’ अशी अपेक्षा व्यक्त केली. साक्षीने आपल्या मनोगतात, ‘आता माझी जबाबदारी वाढली असून मला आता चांगला खेळ करावा लागेल.’ असे स्पष्ट केले.








Be First to Comment