Press "Enter" to skip to content

न्यायालयात बोगस जामिनदारांच्या माध्यमातून जामिन मिळवून देणारी टोळी पुन्हा सक्रिय

बनावट नावाने व कागदपत्रांच्या सहाय्याने न्यायालयाची फसवणुक करणाऱ्या बोगस जामिनदाराला अटक

सिटी बेल | नवी मुंबई |

सीबीडी बेलापुर येथील न्यायलयात बनावट नावाने व बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने आरोपीला जामीन देण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला न्यायालयातील कर्मचाऱयांनी पकडून सीबीडी पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना उघडकिस आली आहे. इकबाल इस्माईल पटेल (47) असे या व्यक्तीचे नाव असून सीबीडी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकिसह, बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

दरम्यान, या आरोपीने यापुर्वी देखील खोट्या नावाने एका आरोपीला जामिन देऊन न्यायालयाची फसवणुक केल्याचे उघडकिस आले आहे. त्यामुळे सीबीडी येथील न्यायालयात बोगस जामीनदार आणि बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून आरोपींना जामिन मिळवून देणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याची चर्चा न्यायालयीन वर्तुळात आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला बोगस जामिनदार इकबाल इस्माईल पटेल हा गत गुरुवारी एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुह्यातील आरोपी तौहीत निसारउद्दीन खान याला जामीन देण्यासाठी सीबीडी येथील न्यायालयात गेला होता.

यावेळी बोगस जामिनदार इकबाल इस्माईल पटेल याने दानिश इरफान खान (47) हे बोगस नाव धारण करुन त्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट आधारकार्ड, रेशन कार्ड, वसई महापालिकेची घर टॅक्स पावती, ऍफिटेव्हीट सोबत घेतले होते. यावेळी वकिल आर.के.सोनार यांनी बोगस जामिनदार इकबाल पटेल याची कागदपत्रे व ऍफिडेविट न्यायालयातील वरिष्ठ लिपिक यांच्याकडून पडताळणी करुन घेतल्यानंतर त्याला न्या. कोळपकर यांच्या न्यायालयात जामिनासाठी हजर करण्यात आले होते.

यावेळी न्या. कोळपकर यांना सदर जामिनदाराला यापुर्वी पाहिल्याचा संशय आल्याने त्यांनी कनिष्ठ लिपीकांना जामिनदारांचे रजिस्टर तपासण्यास सांगितले होते. त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपीला जामीन देखील दिला होता. मात्र, न्यायालयातील सह शिरस्तेदाराला रजिस्टर तपासताना बोगस जामिनदार इकबाल पटेल याचा फोटो निदर्शनास आला. तसेच त्याने यापुर्वी त्याच न्यायालयात इकबाल पटेल या नावाने एपीएमसी पोलीस ठाण्यातील आरोपी सम्राट पात्रो याला जामिन दिल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती न्यायाधीशांना देण्यात आल्यानंतर न्या. कोळपकर यांनी आरोपीला जेलमधुन मुक्त करण्याचा देण्यात आलेला मेमो न्यायालयात जमा करण्यास वकिलाला सांगितले. तसेच न्या. कोळपकर यांनी सदर बोगस जामिनदारावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर बोगस जामिनदार इकबाल पटेल याला सीबीडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याचे खरे नाव इकबाल पटेल असल्याचे व तो नालासोपारा पुर्व येथील आनंदपार्क बिल्डींगमध्ये राहात असल्याचे आढळुन आले. इकबाल पटेल याने न्यायालयात बनावट कागदपत्र सादर करुन न्यायालयाची फसवणुक केल्याचे आढळून आल्याने सीबीडी पोलिसांनी त्याच्यावर फसवणुकिसह बनावटगीरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.