Press "Enter" to skip to content

आवरे गावाचे ऐतिहासिक वारसा असलेले प्राचीन स्वयंभू शिवमंदिर

सिटी बेल लाइव्ह / भक्ती कट्टा / कौशिक मधुकर ठाकूर #

उरण तालुक्यातील काही गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावांमध्ये आज ही इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी अस्तित्वात असल्या तरी त्याचे योग्य प्रकारे संवर्धन न झाल्याने हा ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षित होण्याबरोबरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशाच प्रकारचा प्राचीन ऐतिहासिक ठेवा असणारे उरण तालुक्यातील पूर्वविभागातील एक निसर्ग संपन्न असे आवरे गाव. आवरे गावातून फेरफटका मारल्यास तुम्हाला इतिहासाच्या अनेक खुणा जागोजागी सापडतील.

एखादी प्राचीन संस्कृती ज्या प्रमाणे नदीच्या काठी उदयास येते, व तिचा विकास होते, त्याच प्रमाणे आवरे गाव पाताळगंगा, आंबा , भोगावती, बाळगंगा, निगडे या पाच नद्या ज्या ठिकाणी अरबी समुद्राला मिळून जो त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे, तेथेच वसले आहे.
आवरे गावाला शिवभक्तांचे गाव म्हणून ओळखले जाते, ते येथील प्राचीन स्वयंभू शिवमंदिरामुळे. गावातील लोकांची या भोलेनथावर खूप श्रद्धा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात शिवाला साकडे घालून केली जाते. गावातून कामानिमित्त बाहेर जाणारा प्रत्येक वृद्ध, तरुण,महिला या स्वयंभू भोलेनाथाचे दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नाही. शिवाचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा ठाम विश्वास येथील गावातील शिवभक्तांमध्ये आहे. दरवर्षी गावात महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. त्यानिमित्ताने रात्री पालखीचे आयोजन करतात. या पालखीला उरण तालुक्यातील सर्वात जुनी पालखी म्हणून ओळखतात. पालखी ढोल -ताशाच्या गजरात फिरवतात. महाशिवरात्रीच्या दिवशी गावातील प्रत्येक चाकरमानी, माहेरवाशीण गावात येते. दर सोमवारी संध्याकाळी मंदिरात गेल्या वीस वर्षांपासून सोमवार आरती मंडळातर्फे महाआरतीचे आयोजन केले जाते.
शिलाहार काळातील शिलालेखावरून हे मंदिर प्राचीन आहे हे समजते.गावात असलेल्या गधगळावर शिवलिंग कोरलेले आहे. शक्यतो गधगळवर शिवलिंग नसतो फक्त शैवपंथीय लोकांच्या शिलालेखावर शिवलिंग असतो. शैवपंथीय म्हणजे शंकराचे भक्त म्हणून ओळखले जातात. त्याचा काळ निश्चित सांगता येत नसला तरी, मद्ययुगीन काळातील ११व्या शतकात शिलाहार राजा महाकुमार केशीदेव यांनी लिहिलेल्या ताम्रपटात मंदिराचा उल्लेख आहे. त्याने आवरे व पिरकोन ही दोन गावे ब्राह्मणांना दान करताना जो दान संकल्प केला. त्यावेळी सर्वप्रथम फुले वाहून शिवाची पूजा केली होती. मुघल आक्रमणाच्या काळात देवतांची विटंबना करण्याच्या हेतूने गावात गोहत्या केल्यामुळे स्वयंभू शिवलिंग दुभंगले गेले. शिवलिंगाचा वरचा भाग हा गुळसुंदे येथे गेला असल्याची काल्पनिक कथा आहे. आज गुळसुंदे येथे जे प्राचीन मंदिर आहे तेच ते मंदिर अशी समजूत येथील शिवभक्तांची आहे.
आवरे गावातील शिवभक्तांनी १९१७ साली मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे ठरविले. मंदिरातील शिवलींग खोदून मध्यभागी घेण्याचा प्रयत्न केला. पण काय आश्चर्य पंधरा -सोळा फूट खोदून सुद्धा शिवलिंग बाहेर येत नव्हते. तरीही शिवभक्तांनी खोदकाम चालूच ठेवले असता एक चमत्कारिक घटना घडली. शिवलिंगाच्या सर्व बाजूने गुलालाचे लोट येऊ लागले. अशावेळी शिवलींग आहे तेथेच ठेऊन खोदकाम बंद करावे लागले. मंदिरासाठी लागणारे साहित्य, नक्षीदार सागवान लाकडे गावाच्या समुद्रात आश्चर्यकारक पद्धतीने वाहून आली. आज मंदिरात तीच लाकडे आपल्याला पहावयास मिळतात. पुढची घटना तर वेगळीच आहे. मंदिराचे बांधकाम करतेवेळी गुळ व चुनखडीचे मिश्रण करण्यासाठी घाण्याला रेड्याची आवश्यकता होती. पण सगळीकडे शोधल्यानंतर ही कोठेही रेडा सापडत नव्हता. त्याच वेळी अचानक गावात बेवारस रेडा आला. मंदिराचे सर्व बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याच्या मालकाचा पत्ता नव्हता. पण जेव्हा बांधकाम पूर्ण झाले, तेव्हा चिरनेर येथील नामदेव फोफेरकर हे आपला हरविलेला रेडा शोधण्यास गावात आले असता, त्यांना त्यांचा रेडा सापडला. अशाप्रकारे मंदिराचे काम पूर्ण झाले.
श्रावण महिन्यात शेकडो शिवभक्त भोळेनाथाचे दर्शन घेण्यासाठी आवरे गावच्या शिवमंदिरात येत असतात. आज जरी कोरोनारूपी संकट आपल्यावर आले आहे, ते शिवभोळेनाथांच्या आशीर्वादाने लवकरच दूर होईल असा विश्वास आम्हाला वाटत आहे.

श्री कौशिक मधुकर ठाकूर सर
आवरे -उरण
9821118617

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.