न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील चावणे जवळच्या कोकीयो कॅमलिन कंपनीतील एका अधिकाऱ्याने महिला कामगाराचा विनयभंग केल्याची तक्रार याच कंपनीत काम करणाऱ्या महिलेने रसायनी पोलिस ठाण्यात केली आहे.याबाबत तपासानंतर कॅमलिन कंपनीच्या अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना त्याला अटक न झाल्याने काही सेवाभावी व राजकीय संघटनांनी अटक न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.अखेर कॅमलीन कंपनीच्या अधिकाऱ्यास अटक करुन आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
कॅमलीन कंपनीचे अधिकारी दिलीप तायडे याला अटक व्हावी यासाठी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्यावतीने रसायनी पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले होते.तर मनसेनेही आंदोलनाचा इशारा दिला होता.कामगार महिलेचा विनयभंग करण्यास कारणीभूत असलेला कंपनी अधिकारी दिलीप तायडे व त्याचे सहकारी यांना त्वरित अटक करावी शिवाय कोकीओ कॅमलीन कंपनी व्यवस्थापनाने सदर अधिका-याला व सदर विषयाशी संबंधित सहका-यांना निलंबित करावी अशी मागणी काही संघटनांनी केली आहे.
कॅमलिन कंपनीमध्ये काम करणा-या एका महिलेशी कंपनीमधील अधिकारी दिलीप तायडे हा गेल्या काही महिन्यांपासून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत होता.दमदाटी करून पिडीत महिलेला गप्प केले जात असे,तायडेच्या विरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने अखेर पिडीत महिलेने रसायनी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली.परंतू दिलीप तायडे याला व्यवस्थापनाने निलंबित करावे तसेच त्याला रसायनी पोलिसांनी अटक करावी अशी मागणी हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस घनःश्याम नाईक, इंडियन युथ काॅग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत गायकवाड आणि मनसेचे संदीप ठाकूर यांच्यावतीने रसायनी पोलिस ठाण्यासह वरिष्ठांकडेही करण्यात आली होती.अखेर कॅमलीन कंपनीचे अधिकारी दिलीप तायडे याला रसायनी पोलिसांनी अटक केली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दिलीप तायडे याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्याचे आदेश दिले आहेत.








Be First to Comment