सिटी बेल लाइव्ह / उरण (विट्ठल ममताबादे)
आगरी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आजवर अनेक लेखक,कवींनी प्रयत्न केले आहेत.परंतु “हाल्या मारतंय ह्यलपाटा” फेम रायगडभूषण किशोर पाटील यांचे कार्य नेहमीच आगळेवेगळे असते.त्यांनी “पाण्याच्या झरी आल्या” ही अगदीच नाविण्यपूर्ण अशी प्रतियोगिता राबवून अक्षरश: संपूर्ण गाव आणि पंचक्रोषितील लोकांना आपल्या भूतकाळातील हरवलेल्या गोड आणि सुखद क्षणांची आठवण करण्यासाठी भाग पाडले आहे.
या प्रतियोगितेने सुमारे ८०-९० वर्षांपूर्वीचे दैनंदिन व्यवहार, रूढी, परंपरा, साधनसामुग्रीचे अस्तित्व आणि त्यांचा वापर यावर प्रकाशझोत टाकून या हरवलेल्या गोष्टींना नव्याने उजाळा देवून अलिकडच्या युवा पिढीला थक्क करून सोडले आहे.
आपला आगरी समाज अशा काही वस्तू व्यवहारात वापरत होता त्या वस्तूतर सोडाच पण त्यांची नावेही शब्दकोषात शिल्लक राहिली नाहीत.अशा वस्तूंचे, चालीरीतींचे, पध्दतींचे नव्याने स्मरण करून देण्याचे अनमोल कार्य यामुळे घडले आहे.
ही प्रतियोगिता २० दिवस चालली असल्याने स्पर्धकांनी गावातील वृध्द लोकांकडून माहिती गोळा करण्यासाठी सारा गाव ढवळून काढल्याने सगळीकडे या स्पर्धेची चांगलीच चर्चा होत आहे.
या प्रतियोगितेत मनोज दिनकर गावंड, विलास हनुमंत गावंड, प्रलय पंढरीनाथ गावंड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविले आहेत.या कार्याबद्दल श्री शिवशंकर नाट्य मंडळ पिरकोनचे निर्माते शेखर पाटील आणि सर्व सदस्यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.






Be First to Comment