सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (प्रतिनिधी) :
अलिबाग तालुक्यात निसर्ग चक्रीवादळात ज्यांचे खरोखर नुकसान झाले आहे ते अद्याप शासनाच्या मदतीपासून वंचित असल्याने या ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील रामराज परिसरात ज्यांचे प्रत्यक्ष मोठे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळाली नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
3 जून रोजी रायगडला झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शेती आणि मालमत्तेची प्रचंड हानी झाली. अलिबाग तालुक्यातील बागायती शेती यांनाही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. शासनाने चक्रीवादळाच्या नुकसान नंतर तातडीने पंचनामे सुरू केले. झालेली दुरवस्था पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. शासनाचे पंचनामेही तातडीने सुरू झाले तसेच पंचनाम्यांनंतर मदत वाटपही होऊ लागले आहे. असे असले तरी अलिबाग तालुक्यातील काही ठिकाणी नागरिकांचे खरोखर नुकसान झाले आहे, ज्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना अद्याप मदत मिळाली नाही. विशेष म्हणजे ज्यांचे नुकसान झालेले नाही अथवा अत्यल्प नुकसान झाले आहे त्यांना पन्नास ते साठ हजार रुपये अशी नुकसानभरपाई मिळाली आहे, असा आरोप रामराज परिसरातील नागरिकांकडून होत आहे. रामराज परिसरातील प्रत्यक्ष नुकसानग्रस्त काही नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यात सदर परिसरातील पंचनामा करणारे शासकीय कर्मचारी यांनी मनमानीपणे हे पंचनामे करून आपल्या मर्जीतील अथवा संबंधित राजकीय नेत्याच्या सांगण्यानुसार पंचनामे करून त्यांच्या संबंधित नातेवाईकांना ही अवांतर मदत मिळवून दिली आहे. त्यामुळे या भागातील पंचनाम्यांची चौकशी व्हावी, असा सूरही या नाराज ग्रामस्थांमधून येत आहे तसेच ज्या ग्रामस्थांचे खरोखर मोठे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे करावेत आणि त्यांना शासनाची मदत तातडीने द्यावी अशी मागणी रामराज परिसरातील नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.






Be First to Comment