कशेडी घाटातील भूस्खलनावर तातडीची उपाययोजना करा-खा.तटकरे यांचे निर्देश
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर 9 व 10 जुलैरोजी दरड कोसळल्यानंतर पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गांवावर असलेली कायमची टांगती तलवार हटविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. याखेरिज, येत्या गणेशोत्सवकाळात कशेडी घाटातील वाहतूक कायमस्वरूपी सुरळीत राहण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग आणि एलऍण्डटी कंपनीने सतर्कता बाळगण्याची गरज असून कशेडी घाटातील भूस्खलनावर तातडीची उपाययोजना करण्याची गरज असल्याने 16 ऑगस्टपर्यंत कार्यवाही करा, असे निर्देश रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी दिले.
खा.सुनील तटकरे यांनी शनिवारी दिवसभर सुरू केलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पाहणी दौऱ्याचे शेवटचे ठिकाण पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामधील धामणदिवी गावातील दरडग्रस्त महामार्ग होता. यावेळी त्यांच्यासमवेत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बामणे, महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, एलऍण्डटी ठेकेदार कंपनीचे अभियंता, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा प्रतिमा अभंग जाधव, तालुकाअध्यक्ष वाय.सी.जाधव, अल्पसंख्यांक अध्यक्ष महमद मुजावर, सरचिटणीस सुहास मोरे, धामणदिवीचे सरपंच शांताराम पारदुले आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या क्षमता बांद्रे व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच पारदुले यांनी, 2005 पासून कशेडी घाटातील डोंगराला वरील भागातून भेगा पडल्याने त्यात पावसाचे पाणी शिरून भूस्खलन दरवर्षी होत असल्याचे सांगून धामणदिवी गावाला कायम धोका असल्याचे सांगितले. स्थानिक महिला कार्यकर्त्या क्षमता बांद्रे यांनी दरड कोसळलेला मलबा दरीच्या बाजूला टाकताना खालील पहिल्या पाच शेतकऱ्यांसह नदीपात्रापर्यंतची शेती चिखलामुळे यंदा नापीक झाल्याचे निवेदन दिले. याखेरिज, चौपदरीकरणाचा आणि दरडींचा महामार्गालगतच्या घरांना धोका असल्याने सर्वच घरे आणि जमिनी संपादित करून योग्य मोबदला देऊन आवश्यक तसे स्थलांतर करण्याची गरज यावेळी पत्रकार शैलेश पालकर यांनी व्यक्त केली.
यावेळी खा.तटकरे यांनी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांना धामणदिवीतील शेतकऱ्यांना तातडीची नुकसानभरपाई देण्यासंदर्भात पंचनामे करण्यात यावेत, दरडीच्या धोक्यातील घरांचा आणि चौपदरीकरणामुळे धोका वाढलेल्या घरांबाबत ग्रामस्थांना विचारात घेऊन योग्य मोबदला देऊन आवश्यक असल्यास स्थलांतरही करावे, असे निर्देश दिले. यावेळी कशेडी घाटातील धामणदिवीतील दरडी हटविण्यासाठी येत्या तीन आठवडयात दिवसरात्र प्रयत्न करून 16 ऑगस्टरोजी अभियंत्यांसोबत याप्रश्नी बैठक घेण्याची भूमिका खा.तटकरे यांनी व्यक्त करीत दिवसरात्र सतर्कता बाळगण्याची उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
धामणदिवी ग्रामस्थांनी यावेळी शेतीचे नुकसान, चौपदरीकरणामुळे धोका असूनही भूसंपादनापासून वंचित राहिल्याची माहिती दिल्याने याबाबत खा.तटकरे यांनी प्रांताधिकारी इनामदार यांना याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.






Be First to Comment