कस्टमच्या ताब्यातील सिगरेट चे कंटेनर फोडून चोरांनी सिगरेट केल्या लंपास : सिगरेटच्या जागी ठेवले जुने कपडे
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी सोनारी गाव येथील स्पीडी सी.एफ.एस या वेअरहाऊसमध्ये ठेवलेल्या 5 संशयास्पद कंटेनरमधील तब्बल 55 लाख रुपये किंमतीच्या मालाची अज्ञात चोरटयानी चोरी केल्याचे उघडकिस आले आहे.
विशेष म्हणजे चोरटयानी यातील दोन कंटेनरमध्ये असलेला सिगारेटचा साठा चोरुन त्याऐवजी सदर कंटेनरमध्ये जुने कपडे व वस्तू ठेवल्याचे आढळुन आले आहे. न्हावाशेवा पोलिसांनी कस्टम विभागाने दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात चोरटयाविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
जे.एन.पी.टी बंदरामधुन आयात निर्यात होणाऱया मालाच्या कंटेनरची कस्टम विभागाकडून तपासणी केली जाते. यातील संशयास्पद माल आढळुन येणारे कंटेनर कस्टम विभागाकडून ताब्यात घेण्यात येऊन ते कस्टम विभागाच्या सोनारी गाव येथील स्पीडी सी.एफ.एस या ठिकाणी ठेवण्यात येतात.
त्यानंतर कस्टम विभागाकडून सदर कंटेनर खोलुन त्यांची तपासणी केली जाते. दरम्यान, गत वर्षभरात बालाजी डीस्ट्रीब्युशन, डयुरा एक्झीम, सीमेरी इंडीया ओव्हरसीज या कंपन्यांकडून लेडीज जँकेट,मार्कर पेन आणि फुट वेअर, लेडीज आणि जेन्ट्स गार्मेन्ट व इतर माल आयात करण्यात आला होता.
त्यावेळी कस्टम विभागाकडून परदेशातून आयात करण्यात आलेल्या या 5 संशयास्पद कंटनेरचे स्कॅनिंक करण्यात आले असता, त्यातील दोन कंटेनरमध्ये सिगारेटाचा मोठा साठा असल्याचे व इतर कंटेनरमध्ये देखील संशयास्पद वस्तु असल्याचे आढळुन आले होते.
त्यामुळे कस्टम विभागाने सदरचे कंटेनर ताब्यात घेऊन ते पुढील कारवाईसाठी कस्टम विभागाच्या सोनारी गाव येथील स्पीडी सी.एफ.एस या वेअरहाऊसमध्ये सुरक्षितरित्या ठेवले होते. मात्र कस्टम विभागाने गत महिन्यामध्ये सदर कंटेनर खोलुन त्यांची तपासणी केली असता, 2 कंटेनरमधील सिगारेटचा साठा चोरीला गेल्याचे तसेच त्याऐवजी त्यात जुने लेडीज जॅकेट व वापरलेले कपडे भरल्याचे आढळून आले.
त्याचप्रमाणे इतर तीन कंटेनरमधील मालाची देखील चोरी झाल्याचे आढळून आले. त्यामुळे कस्टम विभागाने सदर कंटेनरमध्ये सापडलेल्या मालाचे वजन करुन कंटेनरच्या स्कॅन रिपोर्टसोबत त्याची पडताळी केली असता, त्यात मोठया प्रमाणात तफावत असल्याचे आढळुन आले. यावरुन अज्ञात चोरटयानी सदर कंटेनरमधील मालाची चोरी करुन त्यात दुसराच टाकाऊ माल भरल्याचे आढळुन आल्यानंतर कस्टम विभागाने या प्रकराची गंभीर दखल घेऊन चोरटयाचा शोध घेण्यासाठी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.








Be First to Comment