कर्जत मधील स्वातंत्र्यसैनिकाच्या दिव्यांग पुत्राचे घर कल्याणच्या समाजसेवकांनी केले उभे

सिटी बेल लाइव्ह / कर्जत ( संजय गायकवाड )
निसर्ग चक्री वादळाने कर्जत तालुक्यातील हुमगांव येथील एका आदिवासी स्वातंत्र्यसैनिकाच्या दिव्यांग पुत्राचे घराचे छप्पर उडून गेल्याने तो उघड्यावर पडला. याबाबत एका निवृत्त शिक्षकाने सोशल मीडियावर घर उभे करण्यासाठी आवाहन केले. त्याच्या हाकेला साद देत कल्याणचे समाजसेवक धावत आले आणि त्यांनी ते घर पुन्हा उभे करून त्या दिव्यांग पुत्राला आसरा मिळवून दिला. मात्र आज दीड – पावणेदोन महिने झाले तरी आद्यापही शासनाकडून त्याला कोणतीही मदत मिळाली नाही.
3 जून रोजी निसर्ग चक्री वादळाचा फटका रायगड जिल्ह्याला बसला. कोरोनाच्या महामारी संकटातच हे चक्री वादळ आले आणि अनेकांची घरे जमीनदोस्त केली. स्वतंत्र भारताच्या चळवळीतील क्रांतिकारक हिराजी गोमाजी पाटील व भाई कोतवाल यांच्या आजाद दस्ता मध्ये कार्यरत असलेल्या स्व. रामू मन्या कातकरी या स्वातंत्र्यसैनिकांचा दिव्यांग मुलगा आण्णा कातकरी यांच्या घराचे छप्पर उडाले व खूप नुकसान झाले. आण्णा हे या घरात एकटेच राहतात. ते दिव्यांग असल्याने सरकारी दरबारी खेटे घालणे त्यांना जमणार नाही हे लक्षात येताच त्या गावातील निवृत्त शिक्षक मारुती बागडे यांनी पंधरा – वीस दिवसांनंतर सोशल मीडियावर कातकरी यांच्या घराची चित्रफीत व्हायरल केली. ही चित्रफीत अंबरनाथचे आदिवासी मित्र सुधाकर झोरे यांनी पाहिली आणि त्यांचे हृदय हेलावले.
झोरे यांनी आपल्या मित्रांना याबाबतची हकीगत सांगितली. त्यांचे कल्याण येथील अश्विन भोईर, हर्षल भोईर, बाळा चौधरी, विवेक गम्भीरराव आदींनी थोडयाच दिवसात हुमगाव गाठले घराची परिस्थिती पाहिली आणि कर्जतला येऊन दरवाजे, पत्रे, पाईप, सिमेंट व जीवनावश्यक वस्तू घेऊन पुन्हा हुमगावला येऊन काही तासातच घर उभे केले. यावेळी सुतार, मिस्त्री मजुरीचा खर्चही या समाजसेवकांनी केला आणि एका स्वातंत्र्य सैनिकांच्या दिव्यांग वारसाला आसरा मिळवून दिला. याबाबत आदिवासी मित्र झोरे यांनी तहसीलदारांशी संपर्क साधला होता परंतु त्यावेळी त्यांना कोणतीही तातडीची मदत मिळाली नाही. मात्र आठ – दहा दिवसांपूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले.






Be First to Comment