नागोठण्यातील कोविड केअर सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत जरी असली तरी महाविकास आघाडीचे सरकार कोणतेही राजकारण न करता कोरोना महामारीशी यशस्वी लढत देत असून कोणतेही औषध उपलब्ध नसताना लक्षपूर्वक काम केल्यास रुग्ण बरा करू शकतो असा जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत. महाविकास आघाडी सरकार राजकारण बाजूला ठेवून आपले कर्तव्य बजावत आहे. रिलायन्स कंपनीने नागोठणे विभागातील कोरोना रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर उपलब्ध करून करून एक सामाजिक उपक्रम राबविला आहे हे निश्चितच कौतुकास्पद काम असून भविष्यात कोरोना सारख्या महामारी आल्यास रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून रिलायन्स कंपनीच्या सहकार्याने रायगडात कायमस्वरूपी मोठे हॉस्पिटल उपलब्ध करून देणार असल्याचे अभिवचन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सहाय्याने नागोठण्यातील भाएसोच्या विद्या संकुलातील इमारतीतील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याद्वारे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांना दवाखान्यात आणा असा आदेश यावेळी त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान नागोठणे विभागात कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून प्रत्यक्षात उपस्थित असलेले खासदार सुनिल तटकरे यांनी ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेकडे साकडे घातले. खासदार सुनिल तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून नागोठणे येथील रिलायन्स कंपनीने भारतीय एजुकेशन सोसायटीच्या एस. डी. परमार इंग्लिश मिडीअम स्कुलच्या इमारतीत उभारलेल्या ५० बेडच्या कोविड सेंटरचे उदघाट्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाएसो च्या कॉन्फरन्स हॉल मध्ये ऑनलाईन करण्यात आले. त्यावेळी प्रत्यक्षात रायगडचे खासदार सुनिल तटकरे, पेण सुधागडचे आमदार रविशेठ पाटील, आमदार अनिकेत तटकरे, भाएसोचे संस्थापक अध्यक्ष राजिप सदस्य किशोर जैन, राष्ट्रवादीचे विभागीय नेते नरेंद्रशेठ जैन, भाई टके, रोहा प. स. सदस्य संजय भोसले, जिल्हा आरोग्य डॉ. सुधाकर मोरे, रोहा प्रांताधिकारी अधिकारी डॉ. यशवंतराव माने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, रिलायन्सचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उद्धव कुमार, रिलायन्सचे अधिकारी विनय किर्लोस्कर, रमेश धनावडे, अजिंक्य पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभय ससाणे, नागोठणे प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष उदय जवके, नागोठणे उपसरपंच सुरेश जैन, डॉ. रोहिदास शेळके आदी तर व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे रायगड पालकमंत्री आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, रायगड जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी, रिलायन्स नागोठणेचे युनिटचे अध्यक्ष अविनाश श्रीखंडे, उपाध्यक्ष चेतन वाळंज आदींनी सहभाग घेतला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश धनावडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, मी केलेल्या विनंती नुसार ५० खाटांची व्यवस्था करून दिल्याबद्दल रिलायन्सचे आभार. आपण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोरोना महामारीशी यशस्वी मुकाबला करीत आहोत. कोरोना महामारी संधर्भात मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यामुळे जनतेत आत्मविश्वास वाढतो आहे. या कोविड सेंटर मध्ये कमीत कमी रुग्ण दाखल व्हावेत अशी भावना व्यक्त करून ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या कृपेने नागोठणे विभागात यापुढे एकही कोरोनाचे रुग्ण वाढू नये अशी प्रार्थना केली.
रायगड पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शासनाने आरोग्य विभागाकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे असे व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सुचविले.






Be First to Comment