शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांना विश्वास
सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (राजेश बाष्टे ) :
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची घट्ट युती होण्याचे संकेत मिळत आहेत. दोन्ही जिल्ह्यातील बलाढ्य पक्ष एकत्र आले तर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आले तर ही स्वागतार्ह गोष्ट असून जिल्ह्याच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्रित काम करतील असा विश्वास अलिबाग शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केला आहे.
रायगड जिल्ह्यातील राजकारण हे नेहमी वेगळ्या वळणावर असते हा नियम आहे. शिवसेना हा आताच्या घडीला सर्वात मोठा पक्ष म्हणून जिल्ह्यात कार्यरत आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1, आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. 2019 च्या निवडणुकीनंतर राज्यातील समीकरण बदलून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन झाली. रायगडचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे याना जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे शिवसेना गोटात नाराजी पसरली होती.
मुंबई येथे महापौर बंगल्यात झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस बैठकीत रायगडात पुन्हा हे दोन पक्ष एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. तालुक्यात ज्या पक्षाची ताकद आहे तिथे त्या पक्षाला सोबत घेऊन दोन्ही पक्ष हे एकत्र येण्याबाबत निर्णय झाल्याचा कंलत आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही आघाडी होणार असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात हे दोन पक्ष एकत्र आल्यास जिल्ह्याच्या विकासाची गंगा वाहू शकते. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असतील तर ही स्वागतर्ह बातमी असून आम्ही त्याचे स्वागत करीत आहोत. असे अलिबाग शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी यांनी म्हटले आहे.






Be First to Comment