Press "Enter" to skip to content

रक्षाबंधन सण जुन्याच राख्यांनी साजरा करावा लागेल


सिटी बेल लाइव्ह / उरण(वैशाली कडू)

बहीणभावाच्या पवित्र नात्याला बांधून ठेवणाऱ्या रक्षाबंधनाच्या सणाला अवघ्या दहा दिवसांचा अवधी आहे. रक्षाबंधननिमित्ताने दरवर्षी बाजारात रंगबेरंगी राख्यांनी दुकाने सजली जातात. मात्र यंदा करोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमुळे राखी व्यवसायावर परिणाम होत असून बाजारात राख्या दाखल झालेल्या नाहीत. बाजारात नवीन राख्या कधी येतील याकडे बहिणींच्या नजरा लागल्या आहेत.
श्रावण पौर्णिमा म्हणजेच राखी पौर्णिमा सोमवारी ३ ऑगस्ट रोजी येत असून या दिवशी आपल्या भावाच्या हातात राखी बांधून बहीण-भाऊ रक्षाबंधन हा सण मोठय़ा उत्साहात साजरा करतात. केवळ हिंदू धर्मामध्येच नव्हे तर इतर धर्मीयांमध्ये ही हा सण मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. भावाच्या हातात आकर्षक, सुंदर आणि हटके अशी राखी बांधण्यासाठी व त्याच्या खरेदीसाठी बाजारात बहिणी गर्दी करण्यास सुरुवात करतात. त्यात बाहेरगावी राहणाऱ्या भावांसाठी १२ ते १५ दिवस आधी राखी खरेदी करून ती पोस्टाने पाठवतात. त्यामुळे दरवर्षी शहरात ठिकठिकाणी विविध राखी विक्रीची दुकाने गजबजलेली असतात.
यंदा करोनाचे सावट असल्याने चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. यामध्ये सर्वच व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यात राखी बनविणाऱ्या कारागिरांच्या हाताला काम नसल्याने हा व्यवसाय ठप्प झाला असून राख्यांचे उत्पादन घटले आहे. बाजारात राख्यांचे प्रकार व माल जुनाच असल्याने खरेदीसाठी जाणाऱ्या बहिणींचा हिरमोड होत आहे.
रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी १५ ते २० दिवस आधीच बाजारात राख्या विक्रीसाठी येतात. मात्र यंदा करोनामुळे टाळेबंदी असल्याने अजूनही राख्या बाजारात दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे मागणी आहे पण माल नसल्याने ज्यांच्याकडे मागील वर्षीच्या राख्या आहेत त्या त्यांनी विक्रीसाठी काढल्या आहेत

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.