“दम मारो दम” ची मजा हुक्का शौकीनांना पडली महागात
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
कामोठे सेक्टर-17 मधील ओम शिवम रेसिडेन्सी या इमारतीत बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कामोठे पोलिसांनी रात्री छापा मारुन हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या 4 महिलासह एकुण 30 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जफ्त केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने रेस्टारंट, बार व इतर आस्थापना सुरु ठेवण्यासंदर्भात नियम व अटी लागु केलेले असताना सदरचे हुक्का पार्लर रात्री उशीरापर्यंत बिनदिक्कत सुरु ठेवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मनाई आदेश लागू करुन सर्व प्रकारची दुकाने, बार, रेस्टारंट व आस्थापनाना सुरु ठेवण्यासाठी नियम व अटी घातल्या आहेत. असे असताना, कामोठे सेक्टर-17 मधील ओम शिवम रेसिडेन्सी या इमारतीत शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कामोठे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सहाय्याक पोलीस निरीक्षक सुरवाडे व त्यांच्या पथकाने कामोठे पोलिसांनी रात्री उशीरा या हुक्का पार्लरवर छापा मारला. यावेळी सदर हुक्का पार्लरमध्ये कोव्हीड-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने पारीत केलेल्या अधिसुचनांचे व अटिंचे उल्लंघन करण्यात आल्याचे आढळून आले. तसेच सदर हुक्का पार्लरमध्ये कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर न ठेवता, सदरचे हुक्का पार्लर बेकायदेशीररीत्या सुरु ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
त्यानंतर पोलिसांनी सदर हुक्का पार्लरचा चालक लखन नरेश ठक्कर (25) व हुक्का पार्लरमध्ये काम करणारे 5 व्यक्ती तसेच त्याठिकाणी हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या 4 महिलांसह एकुण 30 जणांवर कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.








Be First to Comment