Press "Enter" to skip to content

जासई-गव्हाण रस्त्याची दुर्दशा : सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

शेकापचे रमाकांत म्हात्रे यांचा आंदोलनाचा इशारा

सिटी बेल लाइव्ह / उरण(प्रतिनिधी) :

जासई कडून गव्हाणकडे जाणार्‍या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्तावर जागोजागी खड्डेरूपी तळे साचल्याने प्रवास करताना नागरिकांना हालअपेष्टा आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे हेच समजत नाही. हा रस्ता वेळीच दुरुस्त झाला नाही तर याच खड्डयात बसून आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी दिला आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेबाबत शेतकरी कामगार पक्षाचे उरण तालुका युवक अध्यक्ष रमाकांत म्हात्रे यांनी पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता भोये साहेब यांच्या निदर्शनास रस्त्याची दुर्दशा आणून दिली असता त्यांनी उरणचे मुख्य कार्यकारी अभियंता बांगर यांच्याबरोबर बोलतो आणि तुम्हाला संपर्क करण्यास सांगतो असे सांगितले. बांगर यांना संपर्क केला असता ते फोनच उचलत नाहीत. यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना सर्वसामान्य नागरिकांशी काही सोयरसुतक राहिलेले दिसत नाही असे दिसते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाकडे त्यांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांची दर पावसाळ्यात दुरवस्था होत आहे. याबाबत पत्रकार, राजकीय व सामाजिक नेतेमंडळी यांनी निवेदने देऊन बातम्या ही प्रसिद्ध होत आहेत. परंतु या गेंड्याच्या कातडीच्या प्रशासनावर त्याचा काडीचाही फरक पडताना दिसत नाही. उलट अशा प्रकारचे तक्रार किंवा निवेदन आल्यानंतर संबंधित ठेकेदाराला बोलावून घेऊन आपली पोटपूजा करीत असल्यानेच उरणकरांच्या माथी दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याने तक्रारीची दखल रस्ता दुरुस्त केला नाही तर येत्या तीन चार दिवसात याच खड्यात बसून मी आंदोलन करेन, असा इशारा रमाकांत म्हात्रे यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यांच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.