फुरसत नाही घडीची!!
बाई बाई बाई!! किती काम करायची आम्ही बायकांनी! तरीही इकडची स्वारी म्हणते तू दिवसभरात काही करीत नाहीस. घरातल्या बायका तुला काही बोलत नाहीत याचा गैरफायदा घेतेस! यांच आपल काहीतरीच हं!
असं म्हणतात आपण काम केलेलं सांगू नाही. एकत्र कुटुंबात रहायचं म्हटलं की मी एवढं काम करते… असं बोलून चालत नाही. कुटुंब टिकवायचं म्हणजे सोपं का असतं ते.
तरीही तुम्हाला म्हणून सांगतेच आता मी दिवसभरात काय नि कित्ती कामं करते ती! मग तुम्हीच काय तो निवाडा द्या. खरच सांगा मला कोणी आळशी, कामचुकार म्हणाल का ते?
काल रात्रभर इतकं उकडत होतं की डोळ्याला डोळा म्हणून लागला नाही. पहाटे पहाटेस जरा गार वारं सुटलं नि उठायच्या वेळेस माझा डोळाच लागला. इकडं स्वैपाकघरात कपबशांच्या आवाजाने जाग आली. मी पटकन उठलेच हो. भराभर तोंडबिंड धुवून चहा करण्यात मदत करायला गेले तो सगळी पुरूष मंडळी चहा पिऊन आंघोळी करायला निघालेली! मोठ्या जाऊबाई माझ्यासाठी चहाला थांबलेल्या. मला बाई पटकिनी चहा पिणं जमत नाही हो. दिवसभर राबराब राबायचं तर चहा तरी निवांत प्यावा की नाही? मोठ्या जाऊबाई किती भरभर चहा पितात. धाकटीला तर काय मोठ्या जावांसाठी थांबावे हे माहितच नाही. तिने तर माझ्या आधीच चहा पिऊन टाकला आणि बसली होती भांडी विसळत. माझा चहा होईस्तोवर ती आपली भांडीच विसळत होती. माझं झाल्यावर तिला म्हटलं मी दे मी विसळते उरलेली भांडी तू जा तुझ्या कामाला तर म्हणते कशी, “राहू दे मधल्या वहिनी चारच तर राहिलीत, मी विसळते. पण मग सासूबाईच म्हणाल्या, ती म्हणते तर विसळू दे.”
मी घेतली मग भांडी विसळायला. धाकटी म्हणाली चारच आहेत पण मी मोजली नं. चांगली सात भांडी बाकी होती विसळायची. माझं बाई एक आहे, कामाला वेळ लागेल पण करेन ते एकदम चकचकीत. अंमळ वेळच लागला मला उरलेली भांडी चकचकीत करून विसळायला.
मुलं आपापल्या आंघोळी करून दूध प्यायला आली. त्यांना सासूबाई दूध देत होत्या. मी म्हटलं मी तोवर मामंजींच्या पुजेची तयारी करते. परसातल्या बागेत जाऊन फुले तोडू लागले. मला किनई झाडांवरून फुलं तोडताना भाऽरी वाईट वाटतं, बिच्चारी झाडं. बोलत नसली म्हणून काय झालं! मी आपली झाडांना आंजारून गोंजारून हळू हळू त्यांची फुले तोडते. आता याला तुम्ही वेळकाढूपणा म्हणाल का हो? नाही ना? पण आमच्या मामंजीना तसेच वाटते. आतूनच आवाज दिलीन, “फुले झाली का काढून? किती उशीर हा? लवकर तयारी करा म्हणावं पुजेची.” तशी मी लग्गेच आत आले पण तोवर पुजेची उपकरणी सासूबाईंनीच घासून तयार ठेवली होती . मी आपली फुले आणून दिली. तोवर मोठ्या आणि धाकट्या जाऊबाईंची अंगधुणी होऊन त्या न्याहारीच्या तयारीला लागल्या होत्या. मी म्हटलं मी पण येतेच मदतीला अंग धुवून. लगबगीने बंबाजवळ जाऊन पाणी काढले. आता अंग धुवायला असा कितीसा वेळ लागणार? पण काल जरा कंबर धरली होती म्हणून ऊन ऊन पाण्यानं कंबर शेकवीत होते. नेमके तेव्हाच पुरूष मंडळी न्याहारीला आली. मी तिथे नाही हे पाहून इकडच्या स्वारीचा पारा चढलाच. न्हाणीघराजवळ येऊन रागावले मला. आता असं चारचौघात बायकोच्या मागे येणे बरे दिसते का? मी इकडच्या स्वारीला तसं म्हणाले तर म्हणतात कसे राणी साहेबांचे न्हाऊन झाले असेल तर जरा घरात मदतीचे बघा. मी काही करतच नाही की काय? मेला हा बायकांचा जन्मच मुळी वाईट. दिवसभर राबराब राबलं तरी कोण्णाला काही वाटायचं नाही. मी मग गेले तरातरा जेवणखोलीत. पुरूषांच्या आणि मुलांच्या न्याहाऱ्या आटपत आल्याच होत्या. मग जेवण खोली आवरली. आम्हा बायकांची पण न्याहारी आटपली.
मुलं शाळेत आणि पुरुषमंडळी कचेरीत गेली. आता आम्ही बायका स्वैपाकाला लागलो. गडी, मोलकरणी कामावर आले. मी म्हटलं मोठ्या जाऊबाईंना की किती दिवसात घराची नीट स्वच्छताच झाली नाही तर मी बायजेकडून जरा चांगलं झाडून घेते नी दिवाणखान्यातली जाजमं, लोडाचे आणि तक्क्यांचे अभ्रे पांडोबाकरवी बदलून घेते. मग येते स्वयंपाक करायला. दिवाणखान्यात जाऊन एके ठिकाणी बसून त्या दोघांवर नीट लक्ष ठेवून मी दिवाणखाना स्वच्छ करून घेतला. बरं वेळ वाया जाता नये म्हणून तेव्हाच वर्तमानपत्रही चाळले.
तिथून तडक स्वैपाकघरात आले. धाकट्या जाऊबाई मोठ्या वहिनींच्या कानाशी बोलताना माझ्या कानावर पडलच. “आपला स्वैपाक होत आलाय नं, आता येतील बघा मधल्या वहिनी तुमचा स्वैपाक झाला पण इतक्यात असं म्हणत”
म्हणतात नं मधलं होऊ नाही ते काही उगीच नाही. मोठ्यांना मोठेपण मिळतं नी धाकटे काय शेंडेफळ म्हणून लाडके. मधल्यामधे मधले रहातात तसेच! मी ऐकलं हो त्यांचं बोलणं पण काही न बोलता गेले चटणी वाटायला नि कोशिंबीर करायला. अगदी गंधगोळीसारखी बारीक वाटली हो मी चटणी पण कोणाला कौतुक म्हणून नाही. मोठ्या जाऊबाईंच्या मऊसूत पोळ्या नि धाकटीच्या हातच्या भाजीआमटीचं काय ते कौतुक. वर दुपारी जेवायला आल्यावर इकडची स्वारी मोठ्या जाऊबाईंना म्हणते कशी, “वहिनी तुमच्या हाताखाली धाकट्याची बायको चांगलीच तय्यार झाली हं. मधलीलाच कशा विसरलात काही शिकवायला!” सगळीजणं फिदीफिदी हसत होती. मला बाई अस्सा राग आला म्हणून सांगू. पण आपलंच नाणं खोटं मग काय करणार. तोंड दाबून बुक्कीचा मार सहन करायचा झालं.
दुपारी जेवणं आटपून अंमळ आडवी झाले. दुपारचा चहा, मुलांची खाणीबिणी होईस्तोवर मी पण उठलेच. सांजवेळ झालीच होती म्हणून मग दिवाबत्तीची सोय करावी म्हणून पांडोबाकरवी कंदीलाच्या काचा पुसून तेल भरून घेतले , बायजाकरवी सुकलेल्या कपड्यांची उस्तवार करून घेतली.
रात्रीच्या स्वैपाकाला वरणफळं करावयाची होती. आमच्या मोठ्या जाऊबाईंसारखी वरणफळं मला काही जमत नाहीत. त्यामुळे त्यानीच वरणफळं करायला घेतली. धाकटी गेलीच लगोलग त्यांना मदत करायला. मी आपला वरणफळांच्या जोडीला जरा भात टाकला. दह्यात मेतकूट कालवले. थोड्या मिरच्या सांडगे तळले.
साऱ्यांची जेवण झाली. रात्रीचा केर काढून मुलांच्या, सासूबाई मामंजींच्या गाद्या माजघरात घालावयाचे काम माझे आहे पण नेमकी तेव्हाच मला परसाकडे जायची भावना झाली. तिथून जाऊन हातपाय धुवून घरात येई पर्यंत मुलं गादी घालून झोपलेली.
मी आमच्या खोलीत गेले तर इकडची स्वारी म्हणते की रोजच मी कामाच्या वेळी टाळाटाळ करते. काम नाही काडीचं नि फुररसत नाही घडीची.अशी माझी कामं असतात म्हणे. मोठ्या जाऊबाईंच्या आणि सासूबाईंच्या गरीब स्वभावाचा गैरफायदा घेते.काय नि कित्ती तोंडसुख घेत होते.
आता यांच्यासमोर काय बोलणार?
म्हणूनच तर म्हटलं नं बाईचा जन्मच मुळी वाईट.
तुम्हीच सांगा मी म्हणून इतक्या कामांचा रगाडा ओढतेय की नाही??
एक गरीब बिचारी मधली…
समिधा गांधी., पनवेल







Be First to Comment