सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) :
श्रावण हा व्रतवैकल्य आणि सणांचा महिना मानला जातो. याकाळात पूजेच्या साहित्यासह सामान आणि वस्तूंची मोठ्याप्रमाणात बाजारात उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे हे सणच संकटात सापडले आहेत. नागपंचमी या श्रावणाच्या पहिल्या सणावरच कोरोनाची संक्रांत आल्याने पारंपरिक पध्दतीने केल्या जाणाऱ्या भाज्या आणि पूजेचे साहित्य याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर, आदिवासींच्या जीवनावरही याचा मोठा परिणाम होणार असल्याचे दिसते.
पावसाळा सुरू होताच वेध लागतात ते सणांचे. त्यात श्रावण हा सणांच्या महिन्याचा राजा. अगदी गोडाधोडाचे तुपातील नैवेद्य घरोघरी तयार होतात. सणांच्या माध्यमातून परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो. यातून मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्री होते. ग्रामीण भागात सणांसाठी साहित्य सहज उपलब्ध होत असले तरी शहरी भागात त्यासाठी बाजार गाठावे लागते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे सर्वच संकटात सापडले आहेत.
अगदी मिठाईपासून रानभाज्या, फळे, फुले यांची वानवा निर्माण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंग यामुळे सर्वच बाजारपेठा ऐन सणासुदीच्या काळात बंद आहेत. याचा फटका अगदी आदिवासी विक्रेत्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांना बसला आहे.
भक्तांनाही मंदिर प्रवेश नाही
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन काळात सर्व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ऐन श्रावणात भक्तांना मंदिराचे दरवाजे बंद असणार आहेत. दरम्यान याचा फटका मंदिराजवळ छोटी दुकाने असणाऱ्या विक्रेत्यांना बसणार आहे. नारळ, हार, फुले, केळी, दूध आदी पूजेचे साहित्य आता विक्रीसाठी बंद असल्याने यातील काही दुकानदार थेट घरपोच सेवा देत आहेत. त्यामुळे काहीप्रमाणात झालेल्या नुकसानीची तूट भरू शकते असे ते सांगतात.
पूजेचे साहित्य मिळेना
पूजेसाठी साधारणपणे फळे, हार, फुले, नारळ आदींसह अळूची पाने, माठ आणि इतर भाजा लागतात. मात्र वाहतूक बंद असल्याने माल येईनासा झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी अव्वाच्यासव्वा किमतीत पूजा साहित्य विक्री केले जात आहे. नागपंचमीसाठी दूध घरपोच मिळत असले तरी गोमेठ्याचा वेल, लाह्या मिळणे कठीण आहे. त्यामुळे अनेकांनी यंदा नागाच्या मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याचे ठरवले आहे. तसेच उपलब्ध साहित्य पडेल त्या किमतीला भक्त खरेदी करताना दिसतात. तर दुकानदारांनिही येणाऱ्या वस्तू वाढीव किमतीत येत असल्याचे सांगितले.आदिवासींच्या उपजीविकेचा प्रश्न
श्रावणात अनेक आदिवासी रानातील फुले, भाजा बाजारात आणून आपली गुजराण करतात. मात्र, यंदा बाजारपेठ बंद असल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. श्रावणात बर्यापैकी साहित्य विकता येऊ शकत असल्याने सणासुदीच्या काळात पैशाची चणचण तितकीशी भासत नव्हती. यंदा तेही शक्य नाही. त्यामुळे सण कसे साजरे करणार, असा प्रश्न आहे. तर ग्रामीण भागात काहींनी दारोदार विक्री सुरू केल्याचे दिसते.






Be First to Comment