शब्द संगीत क्रमांक ७
आपले निरोगी मन
मन करा रे प्रसन्न |
सर्व सिद्धिचे कारण ||
विज्ञान तंत्रज्ञानाने जितकी भरारी घेतलीय तितके
मुंबई – पुणे सारख्या शहरात सरासरी आयुष्यापेक्षा माणूस कमी जगतो असं म्हणतात .
अजून जरी या विषयावर पूर्णपणे एकमत झालेलं नसलं तरी पण संथ – साधं आयुष्य जगणाऱ्या माणसाचा दिनक्रम आणि शहराच्या धावपळीत जगणारा माणूस यांच्या राहणीमानात नक्कीच फरक आहे . या धावपळीत सर्व आयुष्य यंत्रवत घड्याळाच्या काट्यासारखं झालं आहे…
आपलं मन निर्मळ आणि शरीर निरोगी ठेवणं म्हणजे दुहेरी तारेवरची कसरत करताना मनावरचं दडपण वाढत जातं आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो.
या सगळ्याचं मूळ रोजच्या ताणतणावाच्या परिस्थिती , निकृष्ट आहार , व्यायामाचा अभाव हे आहेच परंतु शरीर आणि मन यांचा ऐकमेकांशी घनिष्ट संबंध आहे . हे आपण सर्व जाणतो आणि अनुभवतो सुद्धा..!
मन अस्वस्थ असेल किंवा आपण घाबरलेलो असलो तर श्वासाची गती वाढते . कोणतेही काम एकाग्रतेने पूर्ण करता येत नाही . मनात निर्माण झालेल्या विकाराचा शरीरावर परिणाम होतो .
बदलते राहणीमान , बदलती विचारसरणी , बदलते वातावरण यामुळं जीवन तणावग्रस्त
होत आहे .
ताण – तणावांचा बाऊ न करता त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग कसे शोधायचे यावर विचार होणं गरजेचं आहे….!
व्यायाम आणि मन आनंदी ठेवणाऱ्या साध्या , सोप्या
गोष्टी करणं कटाक्षाने पाळलं तर यातूंन मार्ग निघू शकतो.
WHO च्या संशोधना प्रमाणे बघीतलं तर फक्त तीस टक्के ताण – तणाव हे शरीरांतर्गत बदलामुळे तर सत्तर टक्के ताण – तणाव हे मनाशी निगडीत असतात .
मनावरच्या विविध ताणामुळे आपल्या शरीराच्या प्रतिकारशक्ती वर परिणाम होतो . दैनंदिन आयुष्यातील अगदी छोट्या छोट्या गोष्टीं मुळे देखील मनावर ताण येतो आणि यामुळे विविध आजार वाढण्याची शक्यता असते. यातूनच माणसं अकाली प्रौढ दिसायला लागतात .
ताण – तणावांना टाळायचे असेल तर या ताणतणावावर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे .
प्रत्येक व्यक्ती ही वेगळ्या वातावरणात वाढलेली असते
त्यामुळं प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात . आणि यामुळं निर्माण होणारे ताण प्रत्येकावर वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या प्रमाणात परिणाम करतात .
ताण कोणत्याही प्रकारचा असला तरी त्यामुळं होणारे शारीरिक , मानसिक त्रास , लक्षणं अनेकदा सारखीच असतात असं मानसोपचार तज्ञांच म्हणणं आहे .
उदा. सतत झोप येणं किंवा मुळीच झोप न येणं, सतत चिडचिड, राग, लोकांमध्ये मिसळण्याची इच्छा न होणं म्हणजे अलिप्त , एकलकोंड होणं, एवढया तेवढया कारणांमुळे रडायला येणं, स्वतःशीच बोलत रहाणं , अधीरता , तसेच छोट्या छोट्या शारिरीक कुरबुरी सुरू होणं यासारख्या तक्रारी दिसून येतात .
शारीरिक व्याधींचा सामोरं जाताना मानसिक संतुलन सांभाळणं कठीण जातं. तेव्हा शरीर आणि मन या दोन्ही गोष्टींकडे स्वतंत्र पणे बघता आलं पाहिजे .
असं जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ अल्बर्ट एलिसने म्हंटलेल आहे .
ताण मोकळे व्हावेत यासाठी योग्य उपाय केले नाहीत तर निराशा मनात कायमचे घर करून राहते.
अपयशानं खचून गेलं की आपली विचार करण्याची शक्ती आपण गमावून बसतो.
ताणतणावात सारासार विचार करता येत नाही . नवनवीन विचारांना आपणच थोपवल्या सारखे होते .
एखाद्या गोष्टीचं आपल्या मनावर जे दडपण असतं त्यामुळं ताण निर्माण होतो. यासाठी तणावाचं नक्की कारण काय..? हे शोधलं पाहिजे
आपल्या घरातल्या व्यक्तीं विषयी , कामाच्या ठिकाणच्या समस्यांसाठी आपण घर किंवा काम सोडू शकत नाही . परंतु काही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात . तसंच काही घटना सुध्दा शक्य असल्यास टाळल्या गेल्या पाहिजेत .
आपल्याला नेहमी असं वाटतं की समोरची व्यक्ती माझ्या पेक्षा खूप सुखी आहे . आणि नेमका हाच विचार समोरची व्यक्ती आपल्या बद्दल करत असते.
आपलं यश हे कोणासाठी तरी अपयश असू शकतं. तसंच आपलं अपयश कुणासाठी तरी यश असू शकतं.
म्हणून यश आणि अपयश या दोन पारड्यांमध्ये स्वतःचं आयुष्य तोलणं योग्य नाही .
स्वतः बद्दल आणि इतरां बद्दल आपल्या अवास्तव , अवाजवी अपेक्षा सुद्धा कधीकधी मनावर ताण आणि दडपण आणतात .
ज्या गोष्टी , घटनांवर आपला ताबा control नाही त्या
गोष्टी , घटनां आपण बदलू शकत नाही .
यामध्ये महत्त्वाचे आणि आपल्या हातात असलेली एकमेव गोष्ट म्हणजे आपण स्वतःला बदलू शकतो.
त्यामुळं जसं आहे तसं स्वतःला आणि समोरच्याला स्वीकारणं योग्य ठरतं.
स्पर्धा , इर्षा , अहंकार , हेवे – दावे, क्रोध जर समूळ मनातून काढून टाकले तर मन जणू प्रसन्नेतेचं भांडार होतं !
म्हणून समर्थ रामदास स्वामींनी म्हंटल आहे .
जगी सर्व सुखी असा कोण आहे |
विचारे मना तूच शोधूनि पाहे ||
अगदी काही वर्षे अगोदर आपल्या भारतीय संस्कृतीची जगभराला देण म्हणजे आपली एकत्रित कुटुंब पद्धती . वसुधैव कुटुंबकम् .
ज्यामुळे घरातल्या प्रत्येक व्यक्ती सोबत जिव्हाळ्याचं नातं असायचं .
घरातील सर्व सदस्य ऐकमेकांसाठी वेळ द्यायचे .
आणि त्यामुळं घरातील एका व्यक्तीची कुठलीही समस्या सोडविण्यासाठी सर्व कुटुंब धीर देत असायचं.
घरातील जेष्ठ व्यक्तींच अनुभवाचं मार्गदर्शन मिळायचं .
यामुळं त्या व्यक्तीला केवढा तरी मानसिक आधार वाटायचा . समस्येचे दडपण किंवा कोणताही ताण येत नसायचा.
रात्री देवळात भजन आरती , कीर्तन , प्रवचन ऐकून अध्यात्मिक आणि मानसिक बळ मिळायचं
आज सर्वच वातावरण बदललंय
सर्वत्र निराशा भासते. कधी सर्व सुरळीत होणार हा प्रश्न लहानां पासून वृद्धां पर्यंत सर्वांनाच भेडसावतोय.
प्रत्येकाला आपली space महत्त्वाची , गरजेची वाटू लागलीय .
परंतु तरीही घरातील एखाद्या व्यक्ती जवळ व्यक्त होणं शेअरिंग करून मनावरचा ताण काही प्रमाणात का होईना कमी करता येऊ शकतो .
आज दर दिवशी वर्तमानपत्र उघडलं की ९० % बातम्या निराशाजनक असतात .
अशा वेळी भावनेच्या आहारी न जातात तर्कसंगत बुद्धी वापरून केलेला विचार योग्य ठरतो.
नकारात्मक घटनेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं तर मनावरचा अनाठायी ताण कमी होतो .
अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे आपले भारतीय योगशात्र , प्राणायामशात्र , ध्यान धारणा , नियमित व्यायाम , वेळेवर पौष्टिक आणि पोषक आहार , आणि महत्त्वाचे म्हणजे सकारात्मक पुस्तकां सोबत सकारात्मक सदृढ विचार असणाऱ्या माणसांची संगत आणि सोबत…..!
आपल्या मनात असंख्य भावभावभावनांचे तरंग असतात
जगदगुरू संत तुकाराम महाराज म्हणतात..
आनंदाचे डोही आनंद तरंग |
आनंदाचि अंग आनंदाचे ||
आपल्या मनातला तरंग हा निखळ , नितळ, निर्मळ आनंदाचा असावा असं आपल्या संतांनी अभंग , कीर्तन , प्रवचन, भारूड यासारख्या विविध माध्यमातून उपदेशात्मक सांगण्याचा प्रयत्न केला आहे . जो आज आणि पुढील शेकडो वर्ष आपल्याला दीपस्तंभा प्रमाणे सत्शील आणि स्वच्छ प्रकाशाचा मार्ग दाखवणारा आहे .
कवीवर्य वसंत बापट यांची एक प्रार्थना आम्हांला शाळेत नियमित पणे म्हणायला सांगत. त्याचा अर्थ किंवा महत्त्व तेव्हा इतके समजत नव्हते पण
आज त्या प्रार्थनेचे महत्त्व आणि खोल अर्थ कळतो आहे…!
ही प्रार्थना शांतपणे डोळे बंद करून म्हंटली , ऐकली तरी मनाच्या गाभाऱ्यात शांत आणि प्रसन्नतेची अनुभूती येते…
आपल्या संतमहंतांनी आपल्याला दिलेली हीच अनमोल शिकवण आपल्याला जगण्यासाठी बळ देते.
जी आज अत्यंत गरजेची , महत्त्वाची आहे .
देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||
दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना ||
जीवनी नवातेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो , धैर्य लाभो , मानवाच्या जीवना ||
भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या भावना
मानवाच्या ऐकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना ||
संगीता थोरात, नवीन पनवेल .







Be First to Comment