Press "Enter" to skip to content

खारघर मध्ये अनैतिक संबंधातून तरुणाला मारहाण

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर‌ |

खारघरमध्ये राहणार्‍या मोहम्मद सफीउल्ला अन्सारी याने त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणार्‍या मोहम्मद इम्रान अब्दुल्ला शेख (25) याला जबरदस्तीने मोटारसायकल वरुन निर्जन ठिकाणी नेऊन त्याला दोघा साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

या मारहाणीत इम्रान शेख जखमी झाला असून त्याला नेरुळ मधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेनंतर खारघर पोलिसांनी मोहम्मद अन्सारी आणि त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

सदर घटनेतील जखमी इम्रान शेख गोवंडी भागात राहण्यास असून त्याला मारहाण करणारा आरोपी मोहम्मद अन्सारी खारघर, सेक्टर-34 मध्ये राहण्यास आहे. मोहम्मद अन्सारी 2018 मध्ये गोवंडी येथे राहण्यास असताना इम्रान शेख याचे त्याच्या पत्नी सोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सदर बाब मोहम्मद अन्सारीला समजल्यानंतर त्याने इम्रान शेख याला दमदाटी केली होती. तसेच त्याच्या विरोधात गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती. मात्र, मागील काही महिन्यांपासून मोहम्मद अन्सारी खारघर येथे पत्नीसोबत राहण्यास गेल्यानंतर देखील इम्रान शेख या मोहम्मद अन्सारी याच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीला भेटत होता.

याबाबतची माहिती मोहम्मद अन्सारीला समजली होती. त्यानंतर इम्रान शेख खारघर, सेक्टर-34 मध्ये उतरुन तळोजाकडे पायी चालत जात असताना, मोहम्मद अन्सारी आणि त्याच्या दोघा साथीदारांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला जबरदस्तीने मोटारसायकलवरुन जवळच्या मैदानात नेवून तेथे त्याला तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर चावुने वार केले. यावेळी इम्रान शेख याने आरडा-ओरड केल्यानंतर तिघांनी तेथून पलायन केले.

त्यानंतर जखमी इम्रान शेख याने तळोजा गावात जाऊन तेथील एका सुरक्षारक्षकाच्या मोबाईलवरुन आपल्या वुटुंबियांशी संपर्क साधत घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याला नेरुळ मधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल केले. सदर घटनेची माहिती मिळाल्यांनतर खारघर पोलिसांनी मोहम्मद अन्सारी आणि त्याच्या दोघा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.