Press "Enter" to skip to content

स्थानिकांची मागणी : माथेरानमध्ये विविध रोपांच्या लागवडीची आवश्यकता

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे #

निसर्ग चक्री वादळाच्या तडाख्यात माथेरान मधील असंख्य जुनी झाडे उन्मळून पडली असल्याने बहुतांश परिसर हे पुर्णतः उजाड झालेले दिसत आहे यासाठी अगणित विविध फळा फुलांच्या रोपांच्या लागवडीसाठी नगरपरिषदेने तसेच वनखात्याच्या संबंधित अधिकारी वर्गाने आणि संयुक्त वन समितीच्या पुढाकाराची गरज असल्याची स्थानिकांमधून मागणी केली जात आहे.
निसर्ग चक्री वादळानत इथली असंख्य वनराई नेस्तनाबूत झाली आहे.जवळपास दोन हजारांहून अधिक जुनी झाडे मुळासहित उन्मळली असल्याने अनेक भागाला उजाड स्वरूप प्राप्त झाले आहे. माथेरानची खरी ओळख ही खऱ्या अर्थाने इथली वनसंपदा आहे. याच वनराईच्या गारव्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांना नेहमीच माथेरानचे उंच उंच डोंगर साद घालत असतात. अतिवृष्टीमुळे इथे मोठया प्रमाणावर मातीची धूप होत असते त्यामुळे झाडे मुळासहित उन्मळून पडण्याची संख्या दरवर्षी पावसाळ्यात वाढत असते. यासाठी माथेरानच्या चोहोबाजूंना धूप प्रतिबंधक रोपांच्या लागवडीसाठी नगरपरिषदेने तसेच निम्म्याहून अधिक भूभाग हा वनखात्याच्या अखत्यारीत येत असल्याने त्यांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण मोहीम यशस्वी होण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करणे गरजेचे बनले असल्याचे स्थानिक नागरीक बोलत आहेत.
पावसाळ्यात इथे वृक्षारोपण केले जाते परंतु जुलै महिना संपायला आला तरीसुद्धा अद्याप इथे याबाबत काहीही ठोस उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेने चांगल्या दर्जाची आणि इथल्या मातीशी अनुरूप रोपे लागवडीसाठी आणल्यास पुन्हा एकदा ही वनराई बहरणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी १६० रोपे नगरपरिषदेने मागविली होती ती तशीच येथील नौरोजी उद्यानात पडून आहेत.आणि विशेष म्हणजे वृक्षारोपणा अगोदरच ही रोपे का मागविण्यात आली होती ? केवळ मर्जीतील ठेकेदारांनाच नेेहमीप्रमाणे विविध कामांत पोसण्यासाठी तर हा खटाटोप सुरू तर नाही ना ?असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.१६० रोपांमधील बहुतेक रोपे सुकून गेली आहेत. यामुळे नगरपरिषदेच्या पैशाचा एकप्रकारे अपव्यय होत आहे.
याकामी मुख्याधिका-यांनी अशा प्रकारांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.अन्यथा नगरपरिषदेच्या पैशाची वारेमाप उधळण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.



माथेरान मध्ये येणारे पर्यटक हे इथल्या गर्द झाडीच्या थंड वातावरणामुळेच नियमितपणे येत आहेत.जर का इथे झाडीच शिल्लक राहिली नाही तर कुणीही इथे फिरकणार सुध्दा नाही. त्यासाठी दरवर्षी इथे वृक्षारोपण करणे काळाची गरज बनली आहे.नागरिकांनी सुध्दा यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.नगरपरिषदेने आणलेली रोपे जर अशाप्रकारे लागवड न करता सुकून जात असतील तर आमच्या सारख्या वृक्षप्रेमींना ही रोपे दिल्यास त्यांचे सुयोग्य पद्धतीने आम्ही माथेरानकर निश्चितपणे संगोपन करू यात शंका नाही.
राकेश कोकळे -अध्यक्ष धनगर समाज माथेरान

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.