रायगडात कोरोनाचा उद्रेक : रुग्णांची 12 हजारी पार
323 जणांचा घेतला कोरोनाने बळी : लॉक डाऊन काळातही रुग्णसंख्या वाढतेय गुणाकार पद्धतीने
सिटी बेल लाइव्ह / पाली / बेणसे.(धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना वेगाने फोफावत असून जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात कोरोनाचा उद्रेक होताना दिसतोय. एका रुग्णसंख्येने सुरू झालेल्या कोरोनाने हळहळू हातपाय पसरत संपूर्ण जिल्ह्याला घट्ट विळखा घातला आहे. बघता बघता जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्येने 12 हजारी पार केली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील मृत्युदर देखील वाढत असून आजवर कोरोनाने 323 जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता दिवसागणिक वाढत आहे.
जिल्ह्यासह राज्य व देशात समूह संसर्गाचा धोका वाढला असून कोरोनाला आता रोखणे कठीण झाल्याने आरोग्ययंत्रणा व जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन नवनवीन कल्पना अंमलात आणत आहे. मात्र लॉकडाऊनसारखा पर्याय अवलंबून देखील रुग्णसंख्या गुणाकार पद्धतीने वाढत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत असल्याचे दिसते.अशातही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 7 हजार 960 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हयात 422 नव्या करोना बाधित रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्येने 12 हजाराचा टप्पा गाठला आहे.
रुग्णसंख्येच्या बाबतीत रायगड जिल्हा राज्यात पाचव्या स्थानावर आला आहे. आजमितीस जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3322 असून यामध्ये पनवेल मनपा-1391, पनवेल ग्रामीण-510, उरण-151, खालापूर-378, कर्जत-81, पेण-398, अलिबाग-403, मुरुड-33, माणगाव-67, तळा-2, रोहा-98, सुधागड-7, श्रीवर्धन-39, म्हसळा-53, महाड-101, पोलादपूर-10 अशा रुग्णांचा समावेश आहे.
8 हजार रुग्णांनी जिंकले कोरोनाचे युद्ध
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या यामध्ये पनवेल मनपा-3 हजार 895, पनवेल ग्रामीण-1 हजार 203, उरण-530, खालापूर-324, कर्जत-291, पेण-450, अलिबाग-388, मुरुड-70, माणगाव-171, तळा-19, रोहा-296, सुधागड-8, श्रीवर्धन-76, म्हसळा-67, महाड-128, पोलादपूर-44 अशी एकूण 7 हजार 960 आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील दिलासादायक असल्याचे दिसते. एका दिवसात पनवेल मनपा-151, पनवेल ग्रामीण-35, उरण-15, खालापूर-6, कर्जत-25, पेण-7, अलिबाग-17, रोहा-3, म्हसळा-7 असे एकूण 266 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने घेतला 323 जणांचा बळी
रायगड जिल्ह्यात कोरोना ने आजवर मृत्युमुखी पडलेल्या एकूण नागरिकांची संख्या 323 वर जाऊन पोहचली आहे, मृत्युदर देखील वाढत असल्याने चिंता वाढत आहे. आजवर मृत पावलेल्या व्यक्तीत पनवेल मनपा-135, पनवेल ग्रामीण-38, उरण-21, खालापूर-21, कर्जत-12, पेण-19, अलिबाग-22, मुरुड-9, माणगाव-3, तळा-2, रोहा-9, सुधागाड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-7, महाड-15, पोलादपूर-5 असे नागरिक मृत पावले आहेत.
एका दिवसात आढळले 422 रुग्ण
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत 422 ने वाढ झाली असून यामध्ये पनवेल मनपा-171, पनवेल (ग्रा)-49, उरण-27, खालापूर-38, कर्जत-24, पेण-29, अलिबाग-49, मुरुड-11, माणगाव-9, रोहा-5, सुधागड-1, श्रीवर्धन-2, महाड-7 असा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून 39 हजार 673 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 451 आहे.
लॉकडाऊन मध्ये आणखीन शिथिलता
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लॉकडाऊनच्या काळात आणखीन शिथिलता आणली आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे विक्री दुकाने/आस्थापना सकाळी 6 ते सकाळी 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. मात्र आता मूळ लॉकडाऊन आदेशात सुधारणा करुन रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रात दूध विक्री दुकाने, किराणा सामान, फळे व भाजीपाला, चिकन, मटण, अंडी, मासे इ. दुकाने/आस्थापना यापुढे सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मान्यता दिली आहे.
दुकानांची वेळ वाढवल्याने व्यापारी, लहान मोठे व्यवसायिक यांनी जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचे स्वागत करून समाधान व्यक्त केले आहे.
अन्यथा….सार्वजनिक सभागृह, शाळा, खाजगी दवाखाने ताब्यात घ्यावे लागतील
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असल्याचे रुग्णांच्या वाढत्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन ठिकठिकाणी कोविड सेंटर निर्माण करीत आहे. सध्यस्थीतीत जिल्ह्यातील रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग, उपजिल्हा रुग्णालय महाड, पेण, पनवेल उपजिल्हा रुग्णालय, इंडिया बुल्स, एम.जी.एम, याठिकाणी विलगी करणं कक्षात ठेऊन उपचार दिले जात आहेत, मात्र दिवसागणिक चारशे च्या आसपास रुग्ण आढळून येत असल्याने रुग्ण वाढीचा दर कायम राहिला तर दवाखाने अपुरे पडतील, व नाईलाजाने सार्वजनिक सभागृह, शाळा, खाजगी दवाखाने कोविड सेंटरसाठी ताब्यात घ्यावे लागतील असे बोलले जात आहे.
अर्थचक्र कोलमडले, सर्वसामान्य संकटात
कोरोनाच्या जैविक महामारीने व सततच्या लॉक डाऊन मुळे झोपडीत राहणाऱ्या गोरगरीब घटकांपासून महाल व ऐशोरामात राहणाऱ्या गर्भ श्रीमंतांची आर्थिक गणित विस्कटली आहेत. मध्यमवर्गीय व गर्भ श्रीमंतांची परिस्तिती काहीशी बेताची आहे. मात्र हातावर पोट असलेल्या कष्टकरी, श्रमजीवी, मजूर, आदिवासी बांधव यांची परिस्तिती अत्यंत हलाखीची आहे. हाती रोजगार नसल्याने घरात मीठ आहे तर डाळ नाही, मसाला आहे तर तेल नाही अशा दारिद्र्य अवस्थेत गोरगरीब लोक जगत आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत आहेत मात्र कोव्हिडं सारख्या राष्ट्रीय आपत्तीत शासन तरी कुणाकुणाचे अश्रू पुसणार अशी अवस्था झाली आहे.
अफवाना पेव
कोरोनाच्या आपत्तीत समाज माध्यम अधिक सक्रिय झालीत. कोरोनाच्या घरगुती उपचारापासून ते कोरोनाची विविध माहिती आता व्हाट्सअप सारख्या समाजमाध्यमांवर धडकू लागली आहे. सदर मॅसेज योग्य की अयोग्य याची शहानिशा न करता लोक उपचार पद्धती अवलंबू लागले आहेत. त्यामुळे या अफवा जीवघेण्या ठरू शकतात असे मत वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवी व तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त करीत आहेत.
कोरोनाची लस कधी येणार?
संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोनाची लस कधी येणार?हा खरा सवाल सर्वांच्या मनामध्ये आहे.भारत, अमेरिका, चीन, जपान, इंग्लंड सारख्या अन्य देशात कोरोना सारख्या भयावह आजाराची लस शोधून काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न होतायत, मात्र कोरोनावर जालीम उपाय ठरणारी लस अद्याप कुठेच आली नाही, कोरोना रुग्णांवर सद्यःस्तीतीत रोग प्रतिकारक शक्तीच्या गोळ्या देऊन नियंत्रण मिळवले जात असले तरी ती कोरोनाची लस बाजारात कधी येणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
कोरोनामुक्त असलेले तालुके कोरोनायुक्त
रायगड जिल्ह्यात पनवेल, श्रीवर्धन, उरण आदी तालुक्यात सुरवातीच्या काळात कोरोनाने प्रवेश केला. काही महिने सुधागड, रोहा, अलिबाग, कर्जत सारख्या अनेक तालुक्यात कोरोनाचे नामोनिशाण नव्हते. मात्र लॉक डाऊन शिथिल झाला आणि मुंबई पुणे व इतरत्र जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल झाले. आणि मग कोरोना मुक्त असलेले तालुके आजघडीला रुग्णसंख्येत आघाडीवर असल्याचे दिसू लागले आहेत.
वैयक्तिक शारीरिक व्यायामासाठी परवानगी
जिल्ह्यात लॉक डाऊन घोषित केले असला तरी रायगड जिल्हाधिकारी यांनी नागरिकांच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी काही परवानग्या दिल्याने रायगडवासीय खुश झालेत. समुद्रकिनारी, सार्वजानिक/खाजगी क्रीडांगणे, सोसायटी/संस्था यांच्या अखत्यारितील मैदाने, उद्याने इत्यादीसह जवळच्या सार्वजानिक खुल्या जागेत वैयक्तिक स्वरुपात शारीरिक व्यायाम उदा. सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉकिंग हे व्यायाम योग्य शारिरीक अंतर ठेवून सकाळी 5 ते सायं.8 या वेळेतील ठराविक कालावधीसाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांचे आवाहन
कोरोना व निसर्ग चक्री वादळासारख्या दोन्ही भयावह संकटांना मोठ्या धीरोदत्ताने व जबाबदारीने सामोरे जात रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी वेळोवेळी अचूक व योग्य निर्णय घेतले. कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी जिल्ह्यातील जनतेला सातत्याने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शासनाचे नियम व अटी शर्थीचे पालन करा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, घरातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांची अधिक काळजी घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले.






Be First to Comment