आमडोशी येथील श्री माणकेश्वर मंदिर ठरतेय सर्पदंश व्यक्तींसाठी जीवनदायी : ग्रामस्थांना विश्वास
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
भिसे खिंडीच्या पायथ्याशी रोहा वाकण रस्त्यावरील रेल्वे फाटका जवळील नागोठणे विभागातील वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील आमडोशी ग्रामदैवत स्वयंभू श्री माणकेश्वर मंदिरात एखाद्या व्यक्तीस सर्प दंश वा तत्सम विषारी प्राणीने दंश केल्यास श्रद्धा बाळगून नेल्यास त्या व्यक्तीतील विष उतरले जाते व ती व्यक्ती बरा होऊन घरी जातो अशी श्रद्धा या गावातील ग्रामस्थांना आहे. या मंदिरात अनेक ठिकाणांहून सर्प दंश व्यक्ती आपले विष उतरवून गेले असून गेल्या आठवड्यात सुकेळी इंदरदेव या आदिवासी वाडीवरील एक व्यक्ती तसेच गुरुवार दि. २३ जुलै रोजी आमडोशी गावातील वृद्ध महिला श्रीमती सुनीता रघुनाथ कामथे या बऱ्या होऊन घरी गेल्या असल्याचे मंदिराचे भोपी रामदास रामजी खरीवाले यांनी पत्रकारांना सांगितले.
याबाबत गावातील जेष्ठ ग्रामस्थ हभप. गजानन महाराज बलकावडे व केशव भोसले यांनी सांगितले की एखाद्या व्यक्तीस सर्प दंश झाल्यास त्यास श्रद्धेने मंदिरात आणून श्री माणकेश्वर महाराजांच्या मूर्ती समोर बसविले जाते व पूजा अर्चा करून कौल लावला जातो. जर कौल डाव्या बाजूने दिला गेला तर विष पूर्णतः उतरलेले नसते व कौल उजव्या बाजूने दिला गेला तर विष पूर्ण उतरले गेलेले आहे असे स्पष्ट होते. याचा आम्हास कित्येक वर्षांपासून अनुभव आहे. या प्रक्रियेला दोन तीन दिवस जातात. तसेच ही प्रथा पिढ्यांपिढ्या चालू आहे. अधिक माहिती देताना हभप. बलकावडे व भोसले सांगतात की, श्री माणकेश्वर महाराज हे जागृत देवस्थान असून हे देवस्थान सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कार्यकाळापासून असून येथे त्यांच्या आरमारातील सटवाजी कदम व कावजी कदम यांनी या मंदिराला भेट दिली असल्याची इतिहासात नोंद आहे. एकदा मूर्ती तोडण्यासाठी काही ठग आले होते त्यावेळी भुंग्यांनी त्या ठगांना सळो की पळो करून सोडला होते असे जुने जाणते लोक सांगतात. १९९६ साली जेष्ठ समाजसेवक कै. तात्यासाहेब टके यांनी माणकेश्वर महाराजांना चांदीचा मुखवटा चढविला होता. तसेच २०१२ ला श्री माणकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यावेळी चांदीचे अधिष्ठान समाजसेवक सोपान जांबेकर व त्यांच्या सहकारींनी दिले होते तसेच या मंदिरात नवरात्रोत्सव व महाशुद्ध द्वितीयेला पारायण होत असते अशीही माहिती यावेळी मिळाली. दरम्यान बाहेरून येणाऱ्या भाविकांना मंदिरात जाण्याचा मार्ग दिसण्यासाठी मार्गालगत एक कमान होणे गरजेचे असून ही कमान नेहमीच सहकार्यांची भूमिका ठेवणारे गाव हद्दीतील सुप्रिम पेट्रोकेमिकल्स कंपनीने करून द्यावी अशी मागणी हभप बलकवडे व भोसले यांनी केली असून त्यांनी या कोरोना महामारीतून सर्वांची सुटका करून गावातील संकटांचे निवारण करा अशी प्रार्थना श्री माणकेश्वर महाराजांना केली आहे.






Be First to Comment