एकाही मोठ्या कंपनीचा वरिष्ठ या ठिकाणी राहत नसल्याने ते स्थानिकांच्या अडचणी पासून अनभिज्ञच !!
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून )
मागील सात दिवसांच्या शासकीय अधिकारी वर्गानेच घोषित केलेल्या अहवालानुसार उरण तालुक्यात एकूण १५३ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असल्याचे समोर आले आहे तर या सात दिवसात आधीच पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णांपैकी १४७ रुग्ण पुर्णतः बरे होऊन घरी परतले आहेत. यापैकी कालच्या तारखेपर्यंत तालुक्यात कोरोना आजाराने मयत झालेल्या रुग्णांचा आकडा बघता बघता २१ वर पोहोचला असून त्यातील काही रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर सुविधा प्राप्त न झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. उरण तालुक्याच्या बाहेर कोट्यावधीचा सी एस आर फंड अगदी सहज उडविणाऱ्या या तालुक्यातील विविध प्रकल्प व्यवस्थापनांना उरण तालुक्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारण्याची सुबुद्धी केंव्हा सुचणार ? हा खरा प्रश्न आहे. विशेष म्हणजे सर्व प्रकल्पांना विविध परवानग्या आणि सोई सुविधा देणाऱ्या तालुका प्रशासनाने देखील प्रकल्पांनी स्वतः या ठिकाणी डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल उभारावे यासाठी आपला दट्ट्या लावल्याचे एकही उदाहरण सध्या तरी दिसत नाही. याचे सर्वात महत्वाचे कारण जे समोर आले आहे ते ऐकून धक्का बसण्याचीच सर्वाधिक शक्यता आहे . या ठिकाणी असलेल्या कोणत्याही प्रकल्पाचा उच्च अधिकारी किंवा अध्यक्ष हे उरण तालुक्यात म्हणजेच प्रकल्पा पासून पाच किमीच्या आत राहतंच नसल्याने तालुक्याची या महामारीने झालेली अवस्था त्यांना स्वतःला अनुभवताच येत नसल्याने त्यांच्यावर कोणताही फरक पडत नाही. त्यातूनच उरण तालुक्याला सोई सुविधा देण्याबाबत प्रकल्पाचे अधिकारी फारसे उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. एकटी जेएनपीटी सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खारीचा वाटा का होईना उचलत असताना तालुक्यात व्यवसाय करून वर्षाकाठी कोट्यवधींचा निव्वळ नफा कमविणाऱ्या ओएनजीसी , बीपीसीएल, जी टी पी एस यासह विविध खाजगी कंपन्या स्वतःहून कधी पुढाकार घेणार ? असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.
उरण तालुक्यातील कोरोना च्या रुग्णांकरिता केवळ कोवीड केअर सेंटर- (CCC) उभारण्यात आले आहे. या ठिकाणी केवळ कोरोना टेस्ट करता येऊ शकते यासाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागतो. त्यासोबत तुमचा आधारकार्ड, टेलीफोन/ मोबाईल नंबर, लक्षणे यांचा उल्लेख करावा लागतो. फार्म भरून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमचा रिपोर्ट येईल. तो जर पॉझिटिव्ह आल्यास, तुम्हाला उपचार घेणे गरजेचे आहे.त्याकरिता डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर (DCHC) उभारण्यात आले असून तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तुम्ही येथे ऍडमिट होऊ शकता. त्याकरिता तुम्हाला ॲम्बुलन्स (ambulance) पाठविली जाईल. ही मोफत सुविधा सिडको ट्रेनिंग सेंटर बोकडविरा व जे.एन.पी.टी. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. ऑक्सीजन गॅस सिलेंडर व ऑक्सिजन गॅस लाईनची व्यवस्था कोविड सेंटर उरण व जे.एन.पी.टी. उरण हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. मात्र हे सर्व करताना एखादा पेशंट सिरीयस झाला तर त्याला डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल (DCH) येथे हलविण्याची गरज भासते. मात्र नेमकी हीच सुविधा उशाला भाराभर कंपन्या आणि देशाला कोट्यवधींचा महसूल मिळवून देणाऱ्या उरण तालुक्यात तयार झालेली नाही ही उरण तालुक्यातील नागरिकांची शोकांतिका आहे. त्यामुळे सामान्य उरणकरांना पुढील उपचार घेण्यासाठी मात्र कसरत करावी लागत आहे. नवी मुंबई , पनवेल आदी भागात तर गेले काही दिवस नव्या पेशंटना बेड मिळणेही मुश्किल बनत चालले आहेत . त्यामुळेच उरण तालुक्यात डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलची नितांत गरज निर्माण झाली आहे.याकरिता तालुक्यातील सर्व कंपन्या आणि तालुका व जिल्हा प्रशासनाने कंबर कसल्यास ते फार काही अवघड नाही. मात्र तालुक्याच्या समस्यांचे नीट जाणीव व्हायला या तालुक्यातील कोणत्याही मोठ्या कंपन्यांचे प्रमुख अधिकारी या ठिकाणी राहत नाहीत. कंपन्यांच्या वसाहतींमध्ये या उच्च अधिकारी वर्गांसाठी अगदी अवाढव्य घरकुलांची व्यवस्था केलेली आहे मात्र त्याच्या डागडुजीवर दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होत असताना अनेक अधिकारी या ठिकाणी राहातच नसल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले. त्यातूनच जी बाब सहज शक्य आहे ते डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटल मात्र उरणकरांसाठी निर्माण होत नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.






Be First to Comment