माथेरान नेरळ -कळंब -पोशीर रस्ता मुदतीत न केल्याने ठेकेदारावर कारवाईचे आदेश
सिटी बेल लाइव्ह / कर्जत (संजय गायकवाड)
माथेरान नेरळ – कळंब – पोशीर रस्ता तयार करण्याचे काम सिद्धिविनायक कन्ट्रक्शनला देण्यात आले होते मात्र मुदत संपूनही काम केले नाही . तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्यांनी त्यास वारंवार सूचना करूनही संबंधित ठेकेदाराने त्याकडे दुर्लक्ष केले . रस्त्या अभावी नागरिकांना त्रास करावा लागत असल्याने अखेर कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करत त्याला काळ्या यादीत टाकावे प्रस्ताव पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविला आहे .
माथेरान नेरळ – कळंब – पोशीर रस्ता ( रा.मा.क्र .109) सुधारणा करणेबाबत हे काम करारनाम्या अन्वये 20/12/2018 रोजी मे. सिद्धिविनायक कन्ट्रक्शन या ठेकेदारास देणेत आले आहे . काम पूर्ण करण्याचा कालावधी 6 महिने इतका होता . हे काम ठेकेदाराने मुदतीत काम पूर्ण केलेले नाही . दि .16/6/2019 रोजी कामाची मुदत संपलेली आहे.तरीही संबंधीत ठेकेदारास संदर्भिय पत्र क्र .2,3,4 व 5 अन्वये वारंवार लेखी व तोंडी सूचना देऊनही ठेकेदार यांनी सा.बां विभाग पनवेल यांच्याशी संपर्क साधून वाढीव मुदतवाढ अद्यापही घेतलेली नाही आणि सदर रस्त्याचे काम पूर्ण केलेले नाही ही बाब गंभीर आहे असे पत्रात सर्वगोड यांनी म्हंटले आहे .
तसेच या पत्रात संबंधीत ठेकेदार हे काम पूर्ण करेल अस वाटत नाही . सदर रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे गावातील नागरिकांची गैरसोय होत असून त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे . लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ या उपविभागात वारंवार काम अपूर्ण असल्याच्या तक्रारी घेवून येत आहेत . या कारणामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . या राज्यमार्गावर काम प्रलंबित असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात होत आहेत तसेच राज्यामार्गाची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी अशी तक्रार विजय रामचंद्र हजारे यांनी मा . मुख्यमत्री महोदय , महाराष्ट्र राज्य व मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री , महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आपले सरकार या पोर्टल वर केलेली आहे . तरीही निर्माण झालेल्या खड्ड्यामुळे अपघात होवून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही व संबंधीत ठेकेदारास वारंवार लेखी व तोंडी सूचना देवून देखील याची दखल घेत नाहीत हि बाब अतिशय गंभीर आहे . तरी संबधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांचा ठेका रद्द करण्यात यावा आणि संबंधीत ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकणेत यावे हि विनंती कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी पनवेल कार्यालयाकडे केली आहे .






Be First to Comment