उपजिल्हा रुग्णालयातील अनेक समस्यांसाठी हरिष बेकावडे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
सिटी बेल लाइव्ह / पेण. ( राजेश कांबळे )
रायगड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी पेण तालुक्यात आजपर्यंत आठशेच्या आसपास कोरोना बधितांची संख्या पोहोचली असल्याने या साथीत पेणच्या उपजिल्हा रुग्णालयात डाॅक्टरांची कमतराता असुन पेणची जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे त्यामुळे या समस्या तातडीने सोडविण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्य मंत्री यांच्याकडे मेलद्वारे केली आहे.
सदर समस्या न सोडविल्यास आपण तहसील कार्यालयासमोर कोणत्याही क्षणी आमरण उपोषण करण्याचा असल्याचा इशारा दिला आहे.
पेण उपजिल्हा रुग्णालयात डॉ. खोलवडीकर हे यापूर्वी कार्यरत होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांची पनवेल येथे नियुक्ती करण्यात आली आहे. पेणमधील कोरोना बधितांचा वाढता आकडा पाहता प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे पेण तालुक्यात असणाऱ्या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांनी पेण उपजिल्हा रुग्णालयातील वाढते रुग्ण लक्षात घेता आठवड्यातील एक वार याप्रमाणे उपजिल्हा रुग्णालयात कामकाज करावे असे आदेश देऊनही हे डॉक्टर या रुग्णालयात का हजर राहत नाहीत याची गोपनीय माहिती घेऊन या डॉक्टरांची सखोल चौकशी करावी तसेच येथे असणा-या अनेक समस्यां सोडविण्यात याव्यात अशी देखील मागणी हरिष बेकावडे यांनी केली असून जर या मागण्यांचा विचार करण्यात आला नाही तर कोणत्याही क्षणी पेण तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी शासनाला दिला आहे.
कोकणचा प्रवेशद्वार असणा-या पेण उपजिल्हा रुग्णालयातील समस्या शासनाने तातडीने सोडवाव्यात कारण आपण जनतेच्या हितासाठी अनेक कामे केली असुन ती सोडविली सुद्धा आहेत त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल तिथे आवाज उठविणारच त्यामुळे पेण उपजिल्हा रुग्णालयात वाढत्या रुग्णांचा विचार करून या ठिकाणी त्वरीत डाॅक्टर उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. हरिष बेकावडे - सामाजिक कार्यकर्ते पेण






Be First to Comment