Press "Enter" to skip to content

काळुंद्रे अंडर पास बुडला पाण्यात

आर डी घरत यांनी दिली होती धोक्याची जाणीव

बेजबाबदार कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करा- आर डी घरत

सिटी बेल लाईव्ह / स्पेशल रिपोर्ट #

काळुंद्रे वासियांनी 15 वर्षे आंदोलन केल्यानंतर बांधलेल्या रेल्वे अंडरपासचे काम निकृष्ट दर्जाचे असून पावसाळ्यात पाणी भरल्याने तो वापरण्याजोगा रहात नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या आंदोलनात प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका निभावणारे आर डी घरत यांनी पुन्हा एकदा आक्रमक होत प्रशासनाला धारेवर धरले आहे. घरत यांचे उग्र रूप पाहता रेल्वे प्रशासनाने सक्शन पंपाद्वारे साचलेले पाणी उपसण्यासाठी सुरुवात केली आहे. असे असले तरीही प्रत्येक पावसाळ्यात ही डोकेदुखी कायम असणार आहे.
जे एन पी टी टर्मिनल्स साठी मालाची ने आण करण्याकरता असलेली महत्त्वाची रेल्वे लाईन काळुंद्रे गावातून जाते.ग्रामस्थांना ही रेल्वे लाईन ओलांडून पलीकडे जावे लागत असे.या रेल्वे मार्गावरील वाढती वाहतूक पाहता नागरिकांच्या लाइन क्रॉस करण्याच्या त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती.जवळपास पंधरा वर्षे अर्ज विनंत्या आंदोलने केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याठिकाणी रेल्वे अंडरपास बांधण्याचे कामास मंजुरी दिली. अंडर पास बांधणीत अनेक त्रुटी होत्या. आर डी घरत यांनी वेळोवेळी त्याची जाणीव रेल्वे प्रशासनाला करून दिली होती.अंडर पास मध्ये साचणार्या पाण्याचा निचरा होणार नाही हे घरत यांनी वृत्तपत्र वाहिन्यांना तिथे बोलावून सिद्ध करून दाखवले होते. प्रसिद्धी माध्यमांनी राळ उठवल्यानंतर पावसाळ्यापूर्वी या कामाची दखल घेऊ असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. परंतु या बाबतीत काहीही न झाल्याने आज अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. साधारण सहा फूट पाणी जमल्यामुळे त्याला तलावाचे स्वरूप आले आहे.
घरत यांनी आक्रमक पवित्रा घेत रेल्वे मार्ग बंद करू असा इशारा देताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी पाहाणी करण्यास आले.त्यांनी तातडीने पंप लावून पाणी उपसा करण्यास सुरुवात केली. परंतु येथील भौगोलिक परिस्थिती पाहता प्रत्येक साधारण स्वरूपाच्या पावसाने देखील येथे पाणी भरणार आहे. त्यामुळे आर डी घरत यांनी याठिकाणी उड्डाणपूल बांधावा अशी मागणी केली आहे, तसेच अनेकदा इशारा देऊन सुद्धा स्थानिकांच्या सूचनांना फाट्यावर मारणाऱ्या कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करा अशी मागणी केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.