Press "Enter" to skip to content

करंजाडे वसाहतीमध्ये कोविड अँटीजेन तपासणी सुरु

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी |

करंजाडे वसाहतीत दिवसेंदिवस कोरोना बांधितांची संख्या वाढत असल्याने करंजाडे वसाहतीमध्ये कोरोना तपासणी सुरु करावे अशी मागणी करंजाडे ग्रा.सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी निवेदनाद्वारे केली होती, तसेच आ. प्रशांत, ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर, विभागीय अध्यक्ष समीर केणी यांनी करंजाडे वसाहतीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याकरिता काय उपाययोजना करता येईल याबाबत सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.बाविस्कर यांच्याबरोबर चर्चा केली होती, त्यानुसार मंगळवारी ता.22 रोजी सिडकोद्वारे रा.जि.प.शाळा चिंचपाडा सेक्टर आर 2 पुष्पक नोडमध्ये बांधितांची अँटीजेन तपासणी सुरु केली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. पनवेल महापालिका व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच सिडकोद्वारे नव्याने विकसित केलेली करंजाडे वसाहतीमध्ये एक लाख लोकसंख्या असलेल्या या वसाहतीमध्ये देखील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र कोरोनाचा वाढत असलेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

करंजाडे वसाहतीतील लक्षण असलेल्या बाधितांना तपासणी किंवा लसीकरण करण्याकरिता थेट पनवेल गाठावे लागत आहे. त्यामुळे वसाहतीतील नागरिकांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर 1 ते 6, तसेच आर- 1 ते आर- 5 येथील सिडको आरोग्य विभागाने माहितीनुसार गेल्या वर्षभरामध्ये 1994 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 1927 जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते. त्याचबरोबर एकूण 34 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सिडको आरोग्य विभागाकडे नोंदविण्यात आली होती. तसेच दर दिवसाला सुमारे 25 ते 30 कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहे. त्याचबरोबर रविवारी ता. 20 रोजी 26 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 21 रोजी 17 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

यावेळी करंजाडे ग्रा.सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी सिडकोकडे पत्रव्यवहार करीत पाठपुरावा सुरु होता, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, शिवसेना शहर प्रमुख गौरव गायकवाड यांनी देखील याविषयाकडे लक्ष घातले होते. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार विजय तळेकर, विभागीय अध्यक्ष समीर केणी यांनी सिडकोचे आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस.बाविस्कर यांच्यासह अधिकारी व डॉक्टर यांच्याशी चर्चा केली होती. तसेच कोरोना बाधितांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने काय उपाययोजजना करता येईल याबाबत चर्चा केली होती.

यावेळी आं. ठाकूर यांनी येथील नागरिकांनी याच ठिकाणी सिडकोकडून अँटीजेन तपासणी व लसीकरण तसेच कॉंटँक्ट ट्रेसिंग या गोष्टी केल्या तरच संख्या कमी होईल असे बाविस्कर यांना सांगितले होते. त्यानुसार बाविस्कर यांनी याविषयाची दखल घेत वसाहतीमध्ये मंगळवार पासून कोरोना अँटीजेन तपासणी सुरु केली आहे. यावेळी करंजाडे वसाहतीमध्ये सिडकोचे डॉक्टर ईशान शेवाळे हे अतिशय चांगली मेहनत घेत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.