Press "Enter" to skip to content

काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांचे गट शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र

थकीत ‘फी’ ने ऑनलाईन वर्गात प्रवेश नाकारला : शुल्काची रक्कम न भरल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले ईमेल केल्याची घटना खारघर मध्ये घडलेली आहेच. इतर अनेक शाळांमध्ये शुल्क न भरल्याने किंवा काही रक्कम बाकी राहिली म्हणून विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्गात प्रवेश नाकारण्यात आला आहे. याबाबत काँग्रेसने शिक्षण विभागाचे लक्ष वेधले आहे. जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देऊन याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

कोणत्याही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही याबाबत संबंधित शाळांना जाणीव करून देण्यात यावी असेही त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.       

पनवेल परिसरात अनेक खाजगी शिक्षण संस्था आहेत. संबंधित शाळांकडून पालकांना सातत्याने वेठीस धरले जाते. भरमसाठ शुल्क त्यांच्याकडून घेतले जाते. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून राज्यातील इतर ठिकाणांप्रमाणेच पनवेल परिसरातील शाळा बंद आहेत. कोरोनाविषाणू चे संक्रमण होऊ नये त्याची लागण विद्यार्थ्यांना होता कामा नये यासाठी शिक्षण विभागाने शाळा बंद ठेवलेल्या  आहेत. मात्र ऑनलाईन शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे.15 जून पासून पनवेल परिसरातील बहुतांशी खाजगी शाळांचे ऑनलाईन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.

शुल्क भरले नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित ठेवता कामा नये अशा प्रकारचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे आहे. कोरोना  वैश्विक संकटात कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. या आजारांमध्ये काही पालकांचा मृत्यू सुद्धा झालेला  आहे. कोरोना नियंत्रणासाठी टाळेबंदी घेण्यात आली असल्याने काहींचा रोजगार हिरावला गेला आहे ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. एकंदरीतच हा साथीचा आजार त्यात नोकरी-व्यवसाय गेल्याने अनेकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे काही पालकांना गेल्यावर्षीचे शुल्क भरता आलेले नाही.

पनवेल परिसरातील निर्ढावलेल्या खाजगी शिक्षण संस्था पालकांच्या अडचणी ऐकून घेत नाहीत. काही काही शाळांनी तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसून देण्यास मनाई केली आहे. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवता येत नाही. असे असतानाही संबंधित शाळांकडून शुल्क न भरल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात आहे.

यासंदर्भात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी पनवेल तालुका शिक्षण कार्यालयाचे लक्ष वेधले आहे. त्यांनी या संदर्भात गटशिक्षण अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.या संदर्भात आपल्या कार्यालयाकडून सर्व खाजगी शिक्षण संस्थांना नोटिसा देऊन शुल्क न  भरल्याच्या  कारणामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसण्यास मनाई करू नये अशा प्रकारच्या सूचना शाळांना देण्यात यावेत. शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

ऑनलाइन वर्ग तरी फीमध्ये सवलत नाहीपनवेल परिसरात सर्व शाळांचे ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत जात नाहीत. त्यामुळे  देखभाल वीज बिल आणि इतर गोष्टींचा खर्च शाळांना नाही. शिक्षकांनाही कमी वेतनावर राबविले जात आहे. काही ठिकाणी तर पगार दिला जात नाही. असे असताना पूर्ण फी पालकांकडून घेतली जात आहे. त्यामध्ये कोणतीही सवलत किंवा कपात करण्यात आलेली नाही. कोरोना वैश्विक संकटात शैक्षणिक संस्थांच्या उत्पन्नावर कोणताच परिणाम झालेला नाही. असे असताना काही पालकांना या अडचणीच्या काळात पैसे भरता आले नाही म्हणून त्यांच्या पाल्यांना ऑनलाईन वर्गात बसू दिले जात नाही. हा असंवेदनशीलतेचा परिपाक असल्याची टीका काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील यांनी व्यक्त केले आहे.


         

खारघर मध्ये फी भरली नाही म्हणून विश्व ज्योत या शाळेने 15 विद्यार्थ्यांचे शाळा सोडल्याचे दाखले पालकांच्या ई-मेलवर पाठवून देले.संबधीत  व्यवस्थापनाने मुलांच्या शिक्षणाचा अधिकार एक प्रकारे हिरावून घेतला आहे. कोरोनाचे  मोठे संकट असल्याने काही पालकांना शुल्क न भरता आले नाही. म्हणून त्यांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन द्यायचे नाही का हा संबंधित शैक्षणिक संस्थांना आमचा सवाल आहे. खारघरच्या या शाळेप्रमाणे इतर ठिकाणी अशा पद्धतीने पालकांना वेठीस धरले जात आहे. त्यांच्या मुलांना ऑनलाइन वर्गात प्रवेश नाकारला जात आहे. या पार्श्वभूमीवर गट शिक्षण अधिकाऱ्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

सुदाम गोकुळ पाटील 

कार्याध्यक्ष, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.