
पनवेल महानगरपालिकेतील महायुतीची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात अधिकृत गट नोंदणी
पनवेल (प्रतिनिधी) पनवेल महानगरपालिकेतील भारतीय जनता पार्टी, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीची अधिकृत गट नोंदणी आज कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी गटनेते नितीन पाटील यांच्यासोबत महायुतीचे नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेच्या २०२६ सार्वत्रिक निवडणुकीत भाजप–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. महायुतीचे एकूण ५९ नगरसेवक विजयी झाले असून यामध्ये भाजपचे ५५, शिवसेनेचे २ व राष्ट्रवादी काँग्रेसचे २ नगरसेवकांचा समावेश आहे.याआधी नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविकांच्या संयुक्त बैठकीत महायुतीच्या गटनेतेपदी नितीन जयराम पाटील यांची निवड करण्यात आली होती. आज झालेल्या गट नोंदणी प्रक्रियेमुळे नितीन पाटील यांची गटनेतेपदी शासनाकडे अधिकृत नोंद करण्यात आली आहे. महायुतीची गट नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर पदांसाठी निवडणूक प्रक्रिया येत्या १० फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.


Be First to Comment