सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
करोना काळात नैराश्येचे मळभ मनावर आले असताना, ताण तणाव समाजात वाढत असताना ‘साहित्यसंपदा’ समुहातर्फे विश्व् विक्रमी काव्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते . १७ जुलै २०२० ते २२ जुलै २०२० दरम्यान पार पडलेल्या ह्या संमेलनास जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळून एक आशेचे आणि सकारत्मतेचे वातावरण निर्माण होण्यास मदत झाली. साहित्यसंपदा आयोजित विश्व् विक्रमी काव्यसंमेलनाचा सांगता सोहळा थाटात पार पडला. अखंड १२१ तास चाललेल्या ह्या काव्यसंमेलनाची नोंद डायमंड बुक ऑफ रेकॉर्डस् यांच्या विश्वविक्रमात नोंदली गेली. संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक आणि गझलकार ए. के शेख ह्यांनी विश्व् विक्रमी काव्यसंमेलनात सहभागी सदस्यांचे अभिनंदन करताना माणसाजवळ ध्येयासक्ती असली की कोणतेही कार्य सहज शक्य होते असे मत मांडले. कवी हा संवेदनशील असून, आज समाजास संवेदनशील माणसांची गरज आहे असे सांगून उपस्थित साहित्यिकांना मार्गदर्शन केले. जेष्ठ साहित्यिक अशोक नायगावकर ह्यांनी ज्ञान भांडार वाढवा, जेष्टांचे साहित्यवाचून ते पुढील पिढीस संग्रही ठेवण्याचा सल्ला दिला. आपले साहित्य स्वाहा पूरती मर्यादित न ठेवता समाजासमोर मांडण्याचे आव्हान नवोदितांना केले. जेष्ठ साहित्यिक अरुण म्हात्रे ह्यांनी, केशव सूतांनी आधुनिक कवितेची सुरुवात केली होती आणि आता सर्वसामान्यांपर्यंत ते पोहचले असल्याचे समाधान व्यक्त केले. त्यांनी आपल्या ऋतू येत आहे पुन्हा पावसाचा या कवितेतून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. लवकरच हा करोना प्रभाव कमी होणार असा सकारात्मक विचार त्यांनी व्यक्त केला. प्रमुख पाहूणे साहित्यिक, पत्रकार, निवेदक व रिलायन्सचे जनसंपर्क संपर्क अधिकारी रमेश धनावडे यांनी साहित्यसंपदा समुहाच्या लॉकडाउनच्या काळात राबविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले व या विश्वविक्रमी काव्यसंमेलनातून लोकांपर्यंत एक उपयुक्त संदेश पोहचला असे मत व्यक्त केले. तसेच त्यांनी काही दर्जेदार कविता सादर करुन साहित्याच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्यासाठी समुहाला शुभेच्छा दिल्या. डॉ.योगेश जोशी ह्यांनी विश्व् विक्रम प्रस्थापित झाल्याची घोषणा केल्या नंतर सर्व सदस्यांना अश्रू आवरणे कठीण गेले. समाजामध्ये साहित्यातून समाजसेवा करता येऊशकते ह्याचे उत्तम उदाहरण हा उपक्रम होता असे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकार साहित्यिक गुरुदत्त वाकदेकर ह्यांनी साहित्यसंपदाच्या कार्यवाही दाखल घेताना समूहाच्या कार्यपद्धतीचे कौतूक केले. सदर उपक्रम राबवताना घेण्यात आलेल्या कष्टांची तोंड ओळख त्यांनी आपल्या भाषणातून करून दिली. विश्व् विक्रमी काव्यसंमेलनाचे समन्वयक कैलास नाईक यांनी अहोरात्र केलेल्या मेहनतीचे वर्णन करताना आनंदाश्रू सांभाळणे कठीण गेल्याचे म्हटले. आभार प्रदर्शन समूह संस्थापक वैभव धनावडे यांनी करताना संमेलन अध्यक्ष, प्रमुख निमंत्रित, मार्गदर्शक यांचे आभार मानले. उपक्रमातील सदस्यांचे अभिनंदन करताना आयोजन समितील सदस्य, विविध समूहांचे संस्थापक, प्रशासक आणि सहभागी सदस्यांचे आभार मानताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. विश्व् विक्रमात नोंद झालेल्या काव्यसंमेलनाचा समारोप सोहळा देखील स्वप्नपूर्तीचे उद्दिष्ट साध्य झाल्याने प्रत्येकाच्या ओठांवर हासू तर डोळ्यात आसू असा रोमांचित करणारा ठरला. संमेलनामध्ये अनेक नामवंत व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले त्या अंतर्गत राजन लाखे ,विश्वस्त आखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ ह्यांनी आपल्या मार्गदर्शनातून कवींना प्रतिभेची ओळख करून दिली . जेष्ठ पत्रकार गझलकार दुर्गेश सोनार ,साहित्यिक नाट्यसीने कलावंत अभय पैर ,कवी पत्रकार अनुज केसरकर ,जेष्ठ गझलकार प्रशांत वैद्य यांनी नवं कवींनी लिहताना कोणती काळजी घ्यावी हे सांगताना आपल्या कविता सादर केल्या.
पल्लवी पतंगे, कैलास नाईक यांनी समन्वयकाची भूमिका बजावली. संमेलनाच्या आयोजन समिती मध्ये श्रुती कुलकर्णी ,सीमा पाटील , जीविता पाटील ,अप्पा वाघमारे ,स्मिता हर्डीकर, सई मराठे, रवींद्र सोनावणे, वैशाली माळी, स्वप्नाली ढोणुक्षे, श्रीकांत पेटकर, ऋचा नीलिमा, सोनाली शेडे, उत्तम चोरडे, वैशाली झोपे, डॉ.शिवकुमार पवार, डॉ. सुवर्णा पाटील, सलोनी बोरकर यांनी मोलाचे योगदान दिले.
सदर सोहळ्यादरम्यान समूह अध्यक्षा नमिता जोशी ,समूह प्रशासक समिती अपेक्षा बिडकर, रसिका लोके, प्रतीक धनावडे, स्मित शिवदास यांनी सहभागी सदस्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वागताध्यक्षा वैशाली कदम यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. संमेलनास मीडिया पार्टनर म्हणून मनोमय मीडिया आणि हेमंत नेते जी.एम. न्युज यांनी पार पाडली. संमेलनास डॉ. योगेश जोशी आणि गुरुदत्त वाकदेकर ह्यांचे मार्गदर्शन लाभले. समूहातर्फे लवकरच कथा महोत्सव आयोजन आणि मराठी संस्कृती, बोली भाषा संवर्धनासाठी साहित्याच्या माध्यमातून चळवळ सुरु करण्यात येईल असे समूह प्रवक्ते मंजुळ चौधरी ह्यांनी जाहीर केले. करोना काळामध्ये सामाजिक उपक्रमांस मर्यादा असताना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पार पडलेले विश्व् विक्रमी काव्यसंमेलन मराठी साहित्य प्रचार आणि प्रसार या सोबतच समाजात साकारात्मता निर्माण करणारे आहे. सद्य परिस्थितीत साहित्य चळवळीला बळ देणाऱ्या अश्या उपक्रमांच्या माध्यमांतून समाजामधील ताण तणाव कमी करणारा ठरला आहे अशी चर्चा सर्वत्र होत आहे. साहित्यसंपदा समूहाने मिळविलेल्या या यशाचे समाजातिल सर्व स्तरातून स्वागत होत असून यासाठी सगळ्यांकडून समुहसंस्थापक वैभव धनावडे व साहित्यसंपदा परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.






Be First to Comment