सिटी बेल |रोहा | अमूलकुमार जैन
|
रोहा तालुक्यातील मौजे पहुर येथे धक्कादायक घटना घडली असून या घटनेत दुर्दैवी २१ वर्षीय प्रथमेश गणेश पहुरकर याचा धरणात बुडून अंत झाल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे .
या बाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रथमेश गणेश पहुरकर (२१ ) रा. पहुर, ता. रोहा, रायगड हा युवक कोविड काळातील लॉकडाऊन मध्ये मुंबई येथून आपल्या गावी कोलाड पहुर येथे एका महिन्यासाठी आला होता. गुरुवार, दि. १० जून रोजी दुपारी २ वाजता आपली बहीण व ४ मित्रांसोबत तो येथील नजीकच्या धरणात पोहण्यासाठी गेला. पोहता पोहता काही क्षणातच तो खोल पाण्यात बुडाला . या घटनेची माहिती कोलाड पोलिसांना मिळताच सपोनि सुभाष जाधव घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी त्वरित राफ्टिंग रेस्क्यू ऑरेशन टीम महेश सानप यांना पाचारण केले.
महेश सानप यांनी घटनास्थळी धाव घेत क्षणाचाही विलंब न लावता शोध मोहीम सुरू केली. परंतु हा युवक खोल पाण्यात बुडाला असल्याने फार उशिरापर्यंत सापडला नाही. तर सायंकाळी अंधार पडल्याने स्कुबा डायव्हिंग करणे अशक्य होते. त्यामुळे सदरची शोधमोहीम थांबवण्यात आली व दुसऱ्या दिवशी ११ जून रोजी पुन्हा सकाळी शोधमोहीम सुरू करण्यात आली. या शोध मोहिमेच्या अथक प्रयत्नानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी पावणे एकच्या दरम्यान रोजी प्रथमेश याचा मृतदेह सापडला .
सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून कोलाड पोलिसात या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून कोलाड सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास शिद करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.








Be First to Comment