सिटी बेल | उरण | वैशाली कडू |
वादळी वारा पावसात आज ऐतिहासीक बेलापूर किल्याचा बुरूज ढासळल्याची घटना घडली. त्याच धर्तीवर उरणमधील द्रोणागिरी किल्ल्याची ही मोठ्या प्रमाणात पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. तरी बेलापूर येथील किल्ल्याप्रमाणे द्रोणागिरी किल्याची दुरवस्था होऊ नये यासाठी या किल्ल्याच्या डागडुजीकडे त्वरित शासनाने लक्ष देऊन आर्थिक निधी द्यावा अशी मागणी पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांच्याकडे
उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.
पडणाऱ्या वादळी पावसाचा झटका ऐतिहासीक बेलापूर किल्याला बसत बुरूज ढासळला आहे. अनेक महिन्यापासून डागडुजीचे काम सुरू होते अशाच प्रकारचा प्राचीन काळापासून उरण बंदर म्हणून प्रसिध्द आहे. त्याकाळी बंदराच्या संरक्षणासाठी उरण गावाभोवती तटबंदी बांधण्यात आली होती. तसेच उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला होता. आजही हा द्रोणागिरी किल्ला अस्तित्वात आहे. विषेश म्हणजे कोणत्याही ऋतूत एका दिवसात करता येण्यासारखा हा छोटा आणि सुंदर असा ट्रेक म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक भागातील भक्तगण येत असतात.
सातवहानांच्या एका शिलालेखात उरण जवळील मोर गावाचा उल्लेख आहे. सातव्या शतकाच्या प्रारंभी पुलकेशी चालुक्याने मौर्यांची घारापूरी ही राजधानी काबीज केल्याचा उल्लेख ऎहोळे येथील शिलालेखात आहे. घारापूरी या राजधानी पासून जवळ असणार्या उरण बंदराचे रक्षण करण्यासाठी करंजा बेटावरील द्रोणागिरी डोंगरावर किल्ला बांधला असण्याची शक्यता आहे.
द्रोणागिरी किल्ला देवगिरीच्या यादवांच्या ताब्यात होता. इ.स.१५३० मध्येपोर्तुगीजांनी किल्ल्याची डागडुजी केली. १५३५ मध्ये अंतोनो- दो- पोर्तो या पाद्रीने नोसा-सेन्होरे, एन.एस. द पेन्हा व सॅम फ्रान्सिस्को ही चर्चेस बांधली. १६ व्या शतकात काही काळ हा किल्ला आदिलशहाकडे होता. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला.मुंबई बेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने घारापूरी किल्ला, उरण गाव व उरण जवळील करंजा बेटावर असलेला द्रोणागिरी किल्ला महत्वाचा होता. १० मार्च १७३९ ला मानाजी आंग्रे यांनी उरणचा कोट व द्रोणागिरी किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला.

परंतु या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाल्याने आता त्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. याकडे वेळीच लक्ष दिले नाहीतर द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. याकडे लक्ष देत त्याची दुरुस्ती त्वरित करून द्रोणागिरी किल्ल्याचे अस्तित्व अबाधीत राखावे.
गेले २ ते ३ दिवसांपासून पडणाऱ्या वादळी पावसाने झोडपून काढले आहेत. याचा फटका ऐतिहासिक बेलापूर किल्ल्याचा बुरुज ढासळण्याची घडना आज घडली. अशीच काही अंशी घटना उरणमधील पुरातन द्रोणागिरी किल्याची पडझड होण्यास सुरुवात झाली आहे. तरी या पुरातन किल्ल्याचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी त्वरित पालकमंत्री आदीतीताई तटकरे यांनी पुढाकार घेऊन शासनाकडून आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी केली आहे.








Be First to Comment