विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी मानवी साखळी आंदोलन
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी उरण, पनवेल, नवी मुंबई व इतर परिसरात मानवी साखळी आंदोलन आज करण्यात आले. यावेळी भररस्त्यावर येथील जनतेने उतरून दि. बा. पाटील यांच्या नावाचा जयघोष केला.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी यांच्या नेतृत्वाखाली १९८४ चा गौरवशाली लढा उभारण्यात आला होता. या लढ्यातून येथील स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला आहे. याचा फायदा देशभरातील जनतेला न्याय मिळाला आहे. दि. बा. पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे रहात आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्तांची मनोमन भावना व लोकनेते दि. बा. यांच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी विमानतळास त्यांचे नाव देण्याची मागणी आहे.

मात्र राज्य सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा घाट रचला आहे. येथील प्रकल्पग्रस्तांनी या नावाला विरोध करत लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. यासाठी आज मानवी साखळी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात उरण, पनवेल व नवी मुंबई येथील हजारो प्रकल्पग्रस्त सामील झाले होते.

या मानवी साखळी आंदोलनात कृती समितीचे पदाधिकारी, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी व गावोगावचे प्रकल्पग्रस्त व विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते.








Be First to Comment