महानगरपालिका आयुक्तांच्या तुघलकी निर्णयाविरोधात जन आंदोलन छेडणार : प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांचा इशारा
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेल महानगरपालिका अधिकाऱ्यांचे डोके ठिकाणावर आहे का हे विचारायची वेळ आता येऊन ठेपली आहे सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर आता दस्तुरखुद्द महानगरपालिका प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांनी महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या तुघलकी निर्णयाविरोधात जन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जाणून घेऊया का दिला संजय भोपी यांनी हा इशारा
पनवेल महानगरपालिकेकडून जनहीत लक्षात न घेता सातत्याने तुघलकी निर्णय नागरिकांच्या माथी मारण्याचा सपाटा चालू आहे. अशाच प्रकारे स्थानिक लोकप्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता अपुऱ्या माहितीच्या आधारे खांदा कॉलोनीमधील सेक्टर ९ हा विभाग क्लस्टर कंटेनमेंट झोन जाहीर करून पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महानगरपालिका क्षेत्रातील इतर परिसरांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत सील केली जात असून खांदा कॉलनी, सेक्टर ९ मधील असंख्य इमारतींमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नसतानाही संपूर्ण विभाग बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय लादण्यात आल्यामुळे हजारो स्थानिक नागरिकांना रहिवाश्यांना नाहक मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. तसेच सदर विभागास बॅरेगेटिंग करताना सेक्टर ५, ६ , ७, ८ या विभागांमध्ये जाण्यासाठी असलेला प्रमुख रस्ताच बंद करण्यात आल्याने तेथील नागरिकांचीही अकारण गैरसोय होत आहे. सेक्टर ९ प्रतिबंधित असताना सेक्टर ७ व सेक्टर ८ मधील काही दुकाने कारवाईचा धाक दाखवत बंद ठेवण्याचा अजब आदेश दिल्याने व्यापारी वर्गही निराश झाला आहे. प्रशासनाच्या या अतातायी निर्णयामुळे खांदा कॉलनीमधील मुख्य बाजारपेठच बंद झाली असून त्यामुळे इतर विभागामध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याकारणाने कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संजय भोपी यांनी दिली आयुक्तांना निवेदन
या सर्व बाबींचा काळजीपूर्वक विचार करून खांदा कॉलनीमधील सेक्टर ९ हा विभाग क्लस्टर कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात यावा व त्या अनुषंगाने चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेले बॅरेगेटिंग ताबडतोब हटविण्यात यावे यासाठी खांदा कॉलनीवासियांच्या वतीने पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती संजय दिनकर भोपी यांनी आक्रमक भूमिका घेत मा. आयुक्त साहेब यांना याबाबतचे लेखी निवेदन ई – मेल द्वारे पाठविले असून त्वरित कार्यवाही न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.







Be First to Comment