शेकाप उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांची जेएनपीटीकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
जगावर कोविड १९ या रोगाच्या महामारीने उरण तालुक्यात उग्ररूप धारण केले आहे. शहरा बरोबर ग्रामीण भागातही कोविडचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. उरणमध्ये अनेक रुग्ण कोरोनाने संक्रमित होऊन २१ जणांचा बळी गेला आहे. तरी तालुक्यात कोरोना रुग्णांसाठी व्हेंटिलेटर सुविधेसह रुग्णालयाची व्यवस्था करावी अशी मागणी जेएनपीटी प्रशासनाकडे शेकापचे उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी केली आहे.
तालुक्यात या महामारीने ४७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. रुग्णालयातील नोंद ही फक्त स्वतः हुन तपासणी करून घेतलेल्या रुग्णांची आहे. प्रत्यक्षात अनेकांना लक्षणा अभावी शासनाकडे नोंद केलेली नाही. सध्यस्थीतीत १६५ रुग्ण हे वैद्यकीय सेवेत उपचार घेत आहेत. तर योग्य उपचार आणि व्हेंटिलेटर सुविधे अभावी आतापर्यंत २१ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी काही रुग्णांना व्हेंटिलेटर व्यवस्था असणारे रुग्णालयाची सोय झाली असती तर त्यांचे जीव वाचू शकले असते.
उरणमध्ये लागण झालेल्या कोरोना रुग्णांना अद्ययावत सुविधेसह सुसज्ज रुग्णालयाची सोय नाही. ज्यांना प्राणवायूची कमतरता जाणवते अशा रुग्णांना उरण, पनवेल, नवी मुंबई, मुबंई येथे व्हेंटिलेटर सोय असलेले रुग्णालय वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे रुग्णांची व नातेवाईकांची अवस्था बिकट होऊन रुग्णास जीव गमवावा लागतो.
गेल्या आठवड्यात जेएनपीटी बंदरातील कर्मचाऱ्यांवर अशीच वेळ आली होती. पनवेल, नवी मुंबई, कळंबोली, खारघर आदी ठिकाणी फिरवून देखील कोणत्याही रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने दाखल करण्यात आले नाही. जेएनपीटी रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. हिंगोराणी यांच्या अथक परिश्रमाने एका रुग्णालयात दाखल करून त्या कर्मचाऱ्याचा जीव वाचविण्यात यश आले.
जेएनपीटी प्रकल्पा करिता येथील शेतकरी व उरणच्या जनतेने सर्वस्व देऊन नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. याची जाणीव ठेवून उरण तालुक्यातील कोविड रुग्णांसाठी लवकरात लवकर व्हेंटिलेटर सुविधेसह रुग्णालयाची व्यवस्था करण्याच्या मागणीचे पत्र जेएनपीटी चेअरमन संजय सेठी यांना शेकापचे उरण तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल यांनी केली आहे.






Be First to Comment