सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू |
उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गावोगावी वाढत चालला आहे. दररोज मृत्यूची आकडेवारीही वाढत चालली आहे. चिरनेर गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दि. ४ जून ते १० जून पर्यंत कडक लॉकडाऊन चिरनेर ग्रामपंचायतीने जाहीर केला आहे. तशाप्रकारे गावात दवंडी पेटवून बॅनर बाजी गावाच्या वेशीवर करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. किराणा दुकाने ११ वाजेपर्यंत तर दुधाची दुकाने सकाळी ९ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यात येणार आहेत. तसेच ३ जून पासून कोरोना बाधीत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी १५ दिवस घराबाहेर पडू नये, विना मास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड ग्रामपंचायत आकारणार आहे.

विना मास्क विक्री करणाऱ्या दुकानदारास ५०० रुपये दंड व ग्रामपंचायतीकडून देण्यात आलेला वापर परवाना रद्द करण्यात येईल. तसेच लग्न समारंभास फक्त २५ माणसांची परवानगी देण्यात आल्याची माहिती सरपंच संतोष चिर्लेकर यांनी दिली.
चिरनेर गाव कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मायक्रो कंटेमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये उरण तहसिलदार कार्यालयाच्या वतीने चिरनेर येथे संपूर्ण ग्रामपंचायतीचे हद्दीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत लोकांमध्ये नागरी संरक्षण दलाचे विलास पाटील, संजय नांदगावकर,नथुराम कातकरी यांनी जनजागृती केली.








Be First to Comment