सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
आजपासून ३१ जुलै पर्यंत राज्यातील यांत्रिक मासेमारी बोटींना पावसाळी मासेमारी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उरणमधील करंजा, मोरा समुद्र किनारी शेकडो बोटी उभ्या राहिल्या राहिल्या आहेत.
या कालावधीत मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते.या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बीज निर्मिती प्रक्रियेस वाव मिळुन मासळीच्या साठ्याचे जतन होते.तसेच या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्त हानी मासेमारी बंदीमुळे टाळता येणे शक्य होते. त्यामुळे कोकण किनाऱ्यावरील शेकडो मच्छिमार बोटी आपापल्या बंदरात नांगर टाकून उभ्या करण्यात आल्या आहेत.
त्यातच मागील दीड वर्षा पासून कोरोना संसर्गाच्या संकटांमुळे येथील मच्छिमारांचे अतोनात नुकसान झाले आहे.जानेवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही मासेमारी व्यवसायाला कळा लागली असून, शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव क्षमविण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे मच्छिमार बांधवांचे कंबरडे मोडले असतांना आत्ता १ जून ते ३१ जुलै या कालावधीतही मासेमारीवर शासकीय नियमांमुळे बंदी आल्याने किनाऱ्यावरील मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असून,उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.
मासळीच्या साठ्याचे जतन तसेच मच्छिमारांचे जीवित व वित्त यांचे रक्षण या हेतूने या वर्षी १ जून ते ३१ जुलै २०२१ या कालावधीत राज्यात सागरी क्षेत्रात सागरी किनाऱ्या पासून १२ सागरी मैलापर्यंत यांत्रिक मासेमारी बोटींना पावसाळी मासेमारी बंदी करण्यात आली आहे.सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही.
महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम ,१९८१ च्या कलम ४ च्या पोट कलम(१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून ही मासेमारी बंदीचा आदेश देण्यात आला आहे.उरण तालुक्यातील करंजा, मोरा बंदरांसह कोकण किनाऱ्यावरील सर्वच बंदरात मासेमारी बोटी नांगरून ठेवल्या आहेत.
शासनाच्या या बंदी कालावधीत मध्ये कुणीही अवैधपणे मासेमारी करण्यासाठी बोटी घेऊन खोल समुद्रात जाण्यास बंदी आहे. तसे शासनाच्या निदर्शनास आल्यास शासनाकडून महाराष्ट्र शासन सदर मासेमारी बोटींवर खटला दाखल होऊन परवाना व व्हेसल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट रद्द होण्याची कार्यवाही सुद्धा होऊ शकते. या बंदी कालावधीमध्ये वादळी हवामान व खराब हवामानमुळे बोटींचे नुकसान झाल्यास शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही.
स्वप्नील दाभणे
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास
व परवाना अधिकारी – उरण








Be First to Comment