सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरण नगरपालिका हद्दीतील उरण मोरा रस्त्यावरील मोरा भवरा येथील भर रस्त्यात डांबरीकरण खचून मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे उरण नगरपालिकेला लक्ष देण्यास सवड नसल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
उरण शहरातील आनंदनगर पासून ते मोरा एनएडी पर्यंतचा भाग उरण नगरपरिषद हद्दीमध्ये येत आहे. येथील रस्ते ही नगरपरिषदेच्या माध्यमातून साकारले जात आहेत. एमएमआरडीए नगरपालिकेने फक्त हनुमान कोळीवाडाच्या पेट्रोल पंप पर्यतच काँक्रीट रस्त्याचे काम केले आहे .त्यामुळे पुढील रस्त्याचे काम केले नसल्याने या भवरा ठिकाणी खड्डे पडले आहेत. एक दोन ठिकाणी रस्ता खचला असून मोठे भगदाड पडले आहे. पावसामुळे भगदाडाच्या खालून संपूर्ण रस्ता खचला जाऊ शकतो.
रस्ता काँक्रेटचे काम गेली ३ ते ४ वर्षे सुरू असूनही आजतागायत पूर्णत्वास गेलेले नाही. याचे सोयरसुतक ना एमएमआरडीए अथवा नगरपालिकेला नसल्याचे दिसते. तसेच इतर अनेक उपक्रम हाती घेऊन त्याचे उदघाटन थाटामटात केले आहेत. पण बहुतांश कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. याबाबत ना सत्ताधारी, ना विरोधक यांचे दुर्लक्ष होत असल्याने जनतेत नाराजीचा सूर निघत आहे.
सदरच्या रस्त्यावरून उरण – मोरा मुंबईकडे जाणाऱ्या प्रवासी वर्गाची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच एनएडी व ग्रँडवेल कंपनीकडे जाणारी वाहतूक मोठया प्रमाणात असते.त्यामुळे एखादा मोठा अपघात ही होण्याची भिती या भगदाडामुळे निर्माण झाली आहे. मग याची जबाबदारी कोण घेईल असा सवाल जनता करीत आहे.
नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी करून हे रस्त्याला पडलेले भगदाड तात्काळ बुजून तसेच इतर प्रलंबित कामे कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावा अशी शहरातील जनतेची मागणी जोर धरू लागली आहे.








Be First to Comment