मृत्यूजंय पथकाकडून चालकाची सुटका
सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर ।
टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे टँकर द्रुतगती मार्गावर लेनमध्ये पलटी झाल्याची घटना रविवारी पहाटे घडली. अपघातामध्ये टँकरमधील चालक गंभीररीत्या जखमी होऊन टँकर मध्ये अडकून पडला होता त्याला बोरघाट पोलिसांनी व देवदूत टीमच्या मदतीने बाहेर काढून उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे.

रविवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास टँकर क्रमांक एमएच-17 -बीडी-4365 हा पुणे बाजूकडून मुंबई बाजूकडे जात असताना बोरघाट ते आडोशी दरम्यान (किमी 40.400 ) चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले. टँकर मुंबई लेन लेनचे बाजूला असलेल्या संरक्षक भिंत व लोखंडी रेलिंग तोडून पुणे लेनवर पलटी होऊन अपघात झाला आहे. टँकर मध्ये अडकून पडलेल्या चालकाची वाहतूक पोलिस व देवदूत टीमने सुखरूप सुटका केली.
टँकर मधील गुळाची मळी पुणे लेनवर पडल्याने पुणे बाजूकडील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. घटनास्थळी पोलीस मदत केंद्र बोरघाटचे सपोनि जगदीश परदेशी, पोउनि महेश चव्हाण व पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी वाहतूक विरुद्ध लेनमधून सुरू करण्यात आली. लेन वर पसरलेली मळी साफ करण्यासाठी खोपोली नगरपरिषद अग्निशमन दल, व आयआरबी व्हॅनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने पाणी मारून मळी हटवली. त्यानंतर मार्ग वाहतुकीस सुरू करण्यात आला.








Be First to Comment