सिडको कधी कारवाई करणार ?
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू ।
उरण कोटनाका येथील अनधिकृत बांधकामांवर आज उरण तहसील कार्यालयाने कारवाई करून ती जमीनदोस्त केली. सिडकोच्या जागेवरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यावर सिडको कधी कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

उरण कोटनाका येथील नाल्यावर अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आले होते. त्यावर कारवाई करण्याची मागणी काही तक्रारदारांनी केली होती. तसेच सदर अनधिकृत बांधकाम धारकांना उरण तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने नोटिसा देऊन काढण्यास सांगितले होते. परंतु सदर बांधकाम काढण्याच्या नोटीस देऊनही बांधकाम न काढल्याने आज तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यास सुरुवात केली.
काही क्षणातच सर्व अनधिकृत बांधकाम जमिनदोस्त करण्यात आले. उरण तहसील कार्यालयाने जशी अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली तशीच कारवाई द्रोणागिरी डोंगरात सुरू असलेले मातीचे उतखनन त्वरित थांबविण्याची कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सिडकोच्या जागेवरही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचे साम्राज्य उभे राहिले आहे. त्यावर सिडको कारवाईचा बडगा कधी उगारणार अशी चर्चा सुरू आहे.
सदर बांधकामे ही अनधिकृत होती. त्यांना नोटीस देऊनही ती हटविण्यात आली नाही. त्यामुळे आज पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.








Be First to Comment