महिला आरोपीस ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी
सिटी बेल । नागोठणे । महेश पवार ।
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीत मौजे चिकणी या गावाच्या हद्दितील रेल्वे उड्डाण पुलाजवळ असलेल्या टपरी वजा दुकानात सुमारे १ लाख ३२ हजार किमतीचा व साडेदहा किलो वजन असलेला गांजा हा मादक व नशाकारक पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय याच ठिकाणी १ हजार ८०० रुपये किंतीची गावठी व ४ हजार २०० रुपये किंतीची देशी दारूही जप्त करण्यात आली आहे. अलिबाग येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नागोठणे पोलिसांच्या सहकार्याने ही कारवाई केली असून चिकणी येथील रेल्वे पुलाजवळ राहणारी महिला आरोपी सुनिता लिबांजी राठोड (वय ५०) हिला अटक करण्यात आले आहे. या महिलेस न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यातील महिला आरोपी ही गांजासह गावठी व देशी दारुची बेकायदेशीरपणे विक्री करीत असल्याची माहिती अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेला मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी नागोठणे पोलिस ठाण्याच्या मदतीने केलेल्या कारवाईत प्लास्टिक गोणीत असलेला १० किलो ५३० ग्रॅम गांजासह तपकिरी रंगाच्या प्लास्टिक कॅन मध्ये असलेली १८ लिटर गावठी दारु व जी.एम.संत्रा गोल्ड कंपनीच्या प्रत्येकी १८० मि.ली. वजनाच्या ७० बाटल्या देशी दारू जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई २६ मे, २०२१ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार खात्री व कारवाई करिता स्था.गु.शा चे स.पो.नि. धनंजय पोरे यांनी आपले सहकारी पोलिस हवालदार स्वप्निल येरुणकर, सचिन शेलार, अमोल हंबीरराव, महिला पोलिस नाईक अभियंती मोकल, चालक पो.ह. देवा कोरम व नागोठणे पोलिसांच्या पथकासह घटनास्थळी जाऊन खात्री केली असता आरोपीच्या स्वताच्या टपरीवजा दुकानात गांजासह गावठी व देशी दारु हा मुद्देमाल मिळून आला.
त्यानुसार आरोपीविरुध्द गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (ग),२० (ब), २ (ब) प्रमाणे तसेच महाराष्ट दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे नागोठणे पोलीस ठाणे गु.र.नं ४३/२०२१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याची माहिती मिळताच रोहाचे पोलिस उपाधिक्षक किरणकुमार सुर्यवंशी यांनी नागोठणे पोलिस ठाण्यास भेट देऊन सदर गुन्ह्याची माहिती घेतली. याप्रकरणी पुढील तपास स्था.गु. अ. शाखेचे सहाय्यक पोलिस उपनिरक्षक, तपासकीय अधिकारी धनंजय पोरे हे करीत आहेत.







Be First to Comment